हैतीतील भूकंपाता आतापर्यंत 700 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू, तर 2800 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 10:00 AM2021-08-16T10:00:02+5:302021-08-16T10:00:46+5:30
earthquake in Haiti: आधीच कोरोना महामारीमुळे त्रस्त झालेल्या हैतीच्या नागरिकांची भूकंपाने आणखी चिंता वाढवली.
पोर्ट-अउ-प्रिंस: 10 वर्षानंतर कॅरेबियन देश हैती भूकंपानं हदरलं. या भूकंपात हैतीमधील अनेक शहरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. हैतीच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, या भूकंपात आतापर्यंत 725 नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर कमीत-कमी 2800 नागरिक जखमी आहेत.
हैतीचे नागरिक सुरक्षा संचालक जेरी चांडलरने सांगितल्यानुसार, भूकंपामुळे जेरेमी, लेस केयस, सेंट लुइस डू सूद आणि लेस एंग्लिस शहरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक घरं जमीनदोस्त झाल्यामुळे शेकडो लोकांचा संसार उघड्यावर पडलाय. नॅशनल सेंटर ऑफ सीस्मोलॉजीने या भूकंपाची तीव्रता 7.2 रिश्टर स्केल असल्याची माहिती दिली.
संकट आणखी वाढण्याची शक्यता
आधीच कोरोना महामारीमुळे त्रस्त झालेल्या हैतीच्या नागरिकांची चिंता भूकंपाने आणखी वाढवली आहे. अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने सांगितल्यानुसार, भूकंपाचे केंद्र राजधानी पोर्ट औ प्रिन्सपासून 125 किलोमीटर अंतरावर होतं. दरम्यान, चक्रीवादळ ग्रेस सोमवारी किंवा मंगळवारपर्यंत हैतीला पोहचणार आहे, त्यामुळे येत्या काही दिवसात हैतीच्या नागरिकांना अजून संकटाचा सामना करावा लागू शकतो.
अनेक देशांनी मदतीची ऑफर दिली
भूकंपानं किमान 860 घरं नष्ट केली तर 700 हून अधिक घरांचं नुकसान झालं आहे. रुग्णालये, शाळा, कार्यालये आणि चर्चेसही मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी यूएसएआयडी प्रशासक समंथा पॉवर यांची हैतीला अमेरिकेच्या मदतीसाठी समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. यूएसएआयडी नुकसानीचे आकलन करण्यात आणि पुनर्बांधणी करण्यात मदत करेल. अमेरिकेसह अर्जेंटिना, चिली आणि अनेक देशांनी मदतीची ऑफर दिली आहे.