शाळेच्या मधल्या सुट्टीत घरं विकून भारतीय वंशाचा तरुण बनला इंग्लंडमधला कोट्यधीश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 04:55 PM2017-10-17T16:55:07+5:302017-10-17T17:00:30+5:30
भारतीय वंशाचा मुलगा इंग्लंडमध्ये सर्वाधिक कोट्यधीश तरुण म्हणून समोर आला आहे. शाळेतील लंच ब्रेकमध्ये हा मुलगा ऑनलाइन इस्टेट एजन्सीद्वारे प्रॉपर्टी विकून कोट्यधीश झाला आहे.
लंडन - भारतीय वंशाचा मुलगा इंग्लंडमध्ये सर्वाधिक कोट्यधीश तरुण म्हणून समोर आला आहे. शाळेतल्या मधल्या सुट्टीत हा मुलगा ऑनलाइन इस्टेट एजन्सीद्वारे प्रॉपर्टी विकून कोट्यधीश झाला आहे. डेली मिररच्या वृत्तानुसार, शाळेच्या मैदानात दुसरी मुलं खेळत असताना हा अवलिया फोनवर डील्स करण्यात व्यस्त असायचा.
19 वर्षांचा अक्षय रुपरेलिया ब-याचदा शाळेच्या वेळेतच फोनवर मालमत्तेच्या व्यवहारासंदर्भात बोली करत असे. अक्षयनं एक कॉल सेंटर सर्व्हिससुद्धा विकत घेतली होती. जेणेकरून तो शाळेत असेल तेव्हा कॉल सेंटरच्या माध्यमातून ग्राहकाला त्यांच्या प्रश्नांची सुयोग्य उत्तरे मिळावीत. शाळेतून सुटल्यानंतर अक्षय त्या ग्राहकांशी संपर्क साधायचा. काही महिन्यांमध्येच गुंतवणूकदारांनी अक्षयच्या कंपनीचे समभाग विकत घेणे सुरू केले. एक वर्षात या कंपनीची किंमत 12 लाख पाऊंडपर्यंत पोहोचली.
या तरुणानं जवळपास 10 कोटी पाऊंडमध्ये घरं विकून टाकली. आता त्यानं जुन्या इस्टेट एजंटांना या व्यवसायातून हद्दपार करण्याचा चंग बांधला आहे. त्याचं कारणही तसंच आहे. एखादा एजंट घर विकण्यासाठी हजारो पाऊंडचं कमिशन घेतो. परंतु अक्षय हे काम फक्त 99 पाऊंडात करतोय. अक्षयची आयडिया एवढी यशस्वी झाली आहे की, त्याची कंपनी इंग्लंडमधली 18वी सर्वात मोठी इस्टेट एजन्सी कंपनी बनली आहे. विशेष म्हणजे अक्षयनं फक्त 16 महिन्यांपूर्वीच कंपनी सुरू केली होती. अक्षयनं ही कंपनी सुरू करण्यासाठी स्वतःच्या कुटुंबीयांकडून 7 हजार पाऊंड उधारीवर घेतले होते. त्याच्या कंपनीत 12 लोक कार्यरत आहेत. अक्षय आता ती संख्या दुप्पट करण्यासाठी प्रयत्नशील आहे. कारण गुंतवणूकदारांनी समभाग खरेदी करण्यासाठी 5 लाख पाऊंड्स दिले आहेत.