भूतानच्या जेत्सुन जगातील सर्वात लहान आणि तरुण महाराणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 11:39 AM2017-12-08T11:39:36+5:302017-12-08T11:58:55+5:30
सोशल मीडियावरील फोटो पाहता भूतानच्या या महाराणी जगातील सर्वात लहान आणि सुंदर महाराणी असल्याचं दिसतंय.
भुतान : काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी एका राजकुमाराला भेटले होते. भुतानचे राजे भारत दौऱ्यावर आले असताना या छोट्या राजकुमाराला भेटण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास वेळ काढला होता. हे इथं आठवण करून द्यायचं कारण असं की, या राजकुमाराची आई म्हणजेच जेत्सुन पेमा वांगचूक या जगातील सगळ्यात लहान आणि तरुण महाराणी असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहेत.
आरव्हीजेसी या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, जेत्सुन पेमा वांगचूक या वयाच्या २१ व्या वर्षी महाराणीच्या गादीवर विराजमान झाल्या होत्या. २०११ साली त्यांनी भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांच्याशी विवाह केला होता. त्या आता २७ वर्षांच्या आहेत. त्या भारतात येऊन गेल्यानंतर अनेक नेटिझन्सने त्यांना सोशल मीडियावर शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या इन्स्टाग्रामवर सक्रीय असल्याचं दिसून आलं. एवढंच नव्हे तर जेत्सुन पेमा यांचा भारताशीही संबंध आहे. शिक्षणासाठी त्या वर्षभर पश्चिम बंगालमध्येही राहिल्या होत्या. म्हणूनच भारत दौऱ्यावर आले असताना त्यांना महत्त्वाचं स्थान प्राप्त झालं होतं.
महाराणी जेत्सुन आणि राजा वांगचुक यांच्यात जवळपास १० वर्षांचं अंतर आहे. भुतानमध्ये जन्माला आलेल्या जेत्सुन यांनी लंडनमध्ये उच्चशिक्षण घेतलं आहे. पण लंडनला जाण्याआधी त्या भारतात वर्षभर शिक्षण घेत होत्या. पश्चिम बंगालच्या सेंट जोसेफ कॉन्वेंट शाळेत त्या शिकल्या आहेत. त्यानंतर हिमाचलमधील एका महाविद्यालयात बारावीपर्यंतच शिक्षण त्यांनी घेतलं. भुतानच्या या महाराणीला हिंदी भाषाही येत असल्याचीही माहिती समोर येतेय. तसंच, इंग्रजी भाषेवरही त्यांचं प्रभुत्व आहे. लंडनहून शिक्षण घेऊन भुतानमध्ये परतलेल्या जेत्सुन यांनी राजा वांगचूक यांच्याशी लग्न केलं. जेत्सुन यांचे वडिल वैमानिक आहेत.
त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून असं दिसतंय की त्यांना भुतानचा पारंपारिक वेशच परिधान करायला जास्त आवडतो. लंडनमध्ये उच्च शिक्षण घेतलेल्या महाराणीला आपला पारंपारिक वेश परिधान करायला आवडतो यावरून नेटिझन्सने त्यांचं कौतुकही केलंय. इन्स्टाग्रामवर त्यांचे जवळपास ७० हजाराहून अधिक फॉलोव्हर्स आहेत. वयाच्या २१ व्या वर्षी महाराणी पदावर विराजमान झालेल्या या राणीला जगातील सगळ्यात तरुण राणी म्हणूनही संबोधलं जातं.
आणखी वाचा - भूतानच्या चिमुकल्या राजकुमारासोबत रमल्या सुषमा स्वराज