‘क्वीनएजर्स’ महिलांनी तोडले साखळदंड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2023 08:53 AM2023-08-08T08:53:55+5:302023-08-08T08:54:03+5:30

नोकऱ्या आणि कॉर्पोरेट क्षेत्रात महिलांचं प्रमाण जगभरात बरंच कमी आहे. याचं कारण त्यांच्यावर असलेल्या विविध जबाबदाऱ्या. त्यांचं ‘बाईपण’ हे ...

'Queenagers' women broke the chains! | ‘क्वीनएजर्स’ महिलांनी तोडले साखळदंड!

‘क्वीनएजर्स’ महिलांनी तोडले साखळदंड!

googlenewsNext

नोकऱ्या आणि कॉर्पोरेट क्षेत्रात महिलांचं प्रमाण जगभरात बरंच कमी आहे. याचं कारण त्यांच्यावर असलेल्या विविध जबाबदाऱ्या. त्यांचं ‘बाईपण’ हे बऱ्याचदा त्यांच्या करिअरमध्ये आडवं येतं. कारण लग्न, त्यानंतर मुलं, संसार, सगळ्यांच्या जबाबदाऱ्या.. या गोष्टी पेलताना त्या कार्यालयीन कामाकडे किती लक्ष देऊ शकतील, अशी शंका नेहमीच व्यक्त केली जाते, त्यामुळेच महिलांना त्यांची क्षमता असतानाही अनेकदा पदं नाकारली जातात. इतकंच काय, त्यांना जबाबदारीची पदं आणि नोकरीही दिली जात नाही. असं असतानाही अनेक महिलांनी आपल्याबद्दलचे हे आक्षेप खोडून काढले आहेत आणि आपली योग्यता पुरेपूर सिद्ध केली आहे. 

    बायका काय करू शकतात? - चूल आणि मूल हेच आणि एवढंच त्यांचं काम आहे, तेवढंच त्यांनी करावं, त्यापेक्षा अधिक त्यांना काही करता येणार नाही, त्यांनी इतर काही करूही नये अन् उगाच समाजाचा समतोलही बिघडवू नये, असंच मत त्यांच्याविषयी व्यक्त होत होतं. या समजाला महिलांनी सर्वप्रथम तडा दिला तो १९८०च्या दशकात. आपल्या पायातले ‘साखळदंड’ तोडून अनेक महिला घराबाहेर पडल्या, जबाबदारीची कामं आणि पदं त्या भूषवू लागल्या. घराच्या, संसाराच्या जबाबदाऱ्या त्यांनी जेवढ्या यशस्वीपणे पेलल्या, तेवढ्याच किंबहुना त्यापेक्षा जास्त क्षमतेने आपल्या कार्यालयीन जबाबदाऱ्यांनाही त्यांनी न्याय दिला. अर्थातच त्यासाठी त्यांना प्रचंड कष्ट सोसावे लागले, अनेक तडजोडी कराव्या लागल्या. पण, आपल्यावरचा आक्षेप पुसून काढत, आपल्यातल्या क्षमता सिद्ध करायच्याच असा चंगच त्यांनी बांधला होता. महिलांची ही पहिली पिढी होती, ज्यांनी हे धाडसी पाऊल उचललं होतं.

खरंच अतिशय कठीण असा तो काळ होता. कारण महिलांनी घराबाहेर पडून पुरुषी क्षेत्रात पाऊल ठेवणं आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना पुरुषांचा बॉस म्हणून काम करणं हेच तेंव्हा अतिशय अचंबित करणारं, पुरुषांना ‘लाजवणारं’, कमीपणा आणणारं होतं. कारण त्यामुळे अनेकांचा इगो दुखावला जात होता. अशा काळात कॉर्पोरेट क्षेत्रात आपली जागा निर्माण करणाऱ्या या महिलांना ‘क्वीनएजर्स’ असं नाव दिलं गेलं. या महिलांचं वय सध्या ४५ ते ६५च्या घरात आहे. यातल्या अनेक महिला आज आपल्या करिअरच्या शीर्ष स्थानी आहेत. चांगला पैसा तर त्या कमवत आहेतच; पण, आपल्याला काय हवं आणि काय नको, कोणतं काम कसं करायचं याचा ‘अधिकार’ही त्यांना आता प्राप्त झाला आहे. त्यामुळे जिथे आपल्याला कामाचं आणि निर्णयाचं अधिक  ‘स्वातंत्र्य’ मिळेल, असे पर्याय त्या शोधताहेत. 

ज्या महिलांनी पहिल्यांदा घराबाहेर पडून केवळ आपलं स्वातंत्र्यच मिळवलं नाही, तर घर-संसार आणि आर्थिक स्वायत्तता अशा दुहेरी जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या त्यांच्यासाठी एक गट त्यावेळी स्थापन झाला होता. त्यांनी ‘नून’ नावाची आपली स्वतंत्र वेबसाइटही सुरू केली होती. या गटाच्या संस्थापक होत्या इलिॲनोर मिल्स. त्यांनीच या महिलांसाठी ‘क्वीनएजर्स’ हा शब्दप्रयोग सर्वांत पहिल्यांदा वापरला होता. नंतर तो जगभरात प्रचलित झाला. या महिलांसाठी हे ‘संधीचं युग’ असल्याचंही प्रतिपादन त्यांनी केलं होतं. 

या क्वीनएजर्स महिला आज आर्थिक आणि वैचारिक असं दोन्ही प्रकारचं स्वातंत्र्य अनुभवत आहेत. यातल्याच काही महिला आपल्या कर्तृत्वानं इतक्या पुढे गेल्या आहेत की आपल्या देशाचा कारभार अतिशय सक्षमपणे त्या सांभाळताहेत. मुळात आपल्या देशाच्या सर्वोच्च स्थानी त्यांनी पोहोचणं ही अतिशय महत्त्वाची, अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. 
जानेवारी २०२३ पर्यंत जगभरातले ३१ देश असे आहेत, जिथे देशाच्या किंवा सरकारच्या प्रमुखपदी २४ महिला कार्यरत आहेत. अर्थातच ‘यूएन विमेन’ आणि जगभरातील इतर अनेक अहवाल हेच सांगतात की, जगात नेतृत्वपदी महिलांची संख्या अजूनही कमीच आहे; पण, त्यांची संख्या वेगानं वाढते आहे. अर्थात त्यांची कार्यक्षमता हेच त्यामागचं कारण आहे. पण, यानिमित्तानं आणखी एक प्रश्न जगभरात उभा राहतो आहे, तो म्हणजे या ‘क्वीनएजर्स’ महिलांनी जे केलं, त्याच पद्धतीनं महिलांची नवी पिढीही करेल? अनेक महिलांपुढे आजही तोच सार्वत्रिक प्रश्न उभा असतो, मुलं झाल्यानंतर ‘करिअर’ कसं करायचं? कारण लग्न आणि मुलं झाल्यानंतर त्यांच्या करिअरला अचानक ब्रेक लागतो.

दहापैकी एक महिला नेतृत्वपदी! 
महिलांना त्यांच्या करिअरमध्ये अडचणी येऊ नयेत यासाठी अमेरिकेत ‘प्रेग्नन्सी वर्कर्स फेअरनेस ॲक्ट’ लागू करण्यात आला आहे. ज्यामुळे गर्भवती महिलांना कामातून सूट, हक्काची रजा आणि ‘रिमोट वर्क’ची सुविधा देण्यात आली आहे. भारतात कॉर्पोरेट क्षेत्रात आज दहापैकी तीन महिला आहेत आणि त्यातील एक महिला नेतृत्वपदी पोहोचली आहे किंवा पोहोचते आहे.

Web Title: 'Queenagers' women broke the chains!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Womenमहिला