अमेरिकेत दुकानांसमोर रांगा, बुट-चप्पल-डायपर ते कारपर्यंत...; लोक का एवढे वेडे झालेत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 17:34 IST2025-04-05T17:33:31+5:302025-04-05T17:34:01+5:30
अमेरिकेत असे वातावरण तयार झाले आहे जसे की मोठा काहीतरी सेल लागला आहे.

अमेरिकेत दुकानांसमोर रांगा, बुट-चप्पल-डायपर ते कारपर्यंत...; लोक का एवढे वेडे झालेत...
अमेरिकेत असे वातावरण तयार झाले आहे जसे की मोठा काहीतरी सेल लागला आहे. वस्तू आधीच स्वस्त होत्या, त्यावर आता आणखी ३०-४० टक्क्यांचा डिस्काऊंट मिळत असल्यासारखे अमेरिकी लोक दुकानांत गर्दी करू लागले आहेत. कारण राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेला रेरिप्रोकल टॅक्स ९ एप्रिलपासून लागू होणार आहे. यामुळे या आयात होणाऱ्या वस्तूंचे भाव रातोरात ३५-४० टक्क्यांनी वाढणार आहेत. यामुळे ही लोकांनी खरेदी सुरु केली आहे.
यामुळे गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी संपूर्ण देशात झुंबड उडाली आहे. यामुळे लोकच नाहीत तर दुकानदारही कमी किंमतीत मिळणाऱ्या वस्तूंचा साठा करण्याच्या मागे लागलेले आहेत. जेव्हा टॅरिफ लागू होईल तेव्हा या वस्तू त्यांना जास्त किंमतीत विकायच्या आहेत, तसेच लोकांना महाग वस्तू खरेदी करायच्या नाहीत हा या मागचा उद्देश आहे.
व्यापार क्षेत्र समतल करण्यासाठी अमेरिकेने भारतासह अनेक देशांवर टेरिफ लादलेले आहे. यामुळे वाहनांच्या किंमतीदेखील वाढण्याची शक्यता आहे. यामुळे वाहन कंपन्यांच्या शोरुममध्येही गर्दी होत आहे. मोठ्या संख्येने लोक कार आणि व्यावसायिक वाहने खरेदी करत आहेत. लॅपटॉप, स्मार्टफोन आणि टॅब्लेट सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या अमेरिकेबाहेर बनविण्यात आल्या आहेत, त्या खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली आहे. चिनी उत्पादने मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात आहेत.
परदेशी कंपन्यांचे फ्रिज,वॉशिंग मशीन, डिश वॉशर अशा वस्तू खरेदी केल्या जात आहेत. घर निर्मितीसाठी लागणाऱ्या वस्तू देखील महाग होणार आहेत, यामुळे ज्यांचा प्लान आहे ते या खरेदीसाठी घाई करत आहेत. ट्रेड मिल, मसाज चेअरलाही मोठी मागणी आली आहे. ट्रम्प यांच्या ताज्या टॅरिफ घोषणेला प्रत्यूत्तर म्हणून चीनसारख्या देशांनीही टॅरिफ वॉर सुरु केले आहे. यामुळे जागतिक मंदी येण्याची चिन्हे आहेत. जागतिक अर्थव्यवस्था वर्षाच्या अखेरीस मंदीत जाण्याची शक्यता ६०% असल्याचे मत जे पी मॉर्गनने व्यक्त केली आहे.