अन् अमेरिकेचा जीव भांड्यात पडला, रॅकूनच्या थरारक चढाईमुळे थांबला देश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 12:11 PM2018-06-14T12:11:16+5:302018-06-14T12:11:16+5:30
रॅकून हा मध्यम आकाराचा एक प्राणी असतो. तो अमेरिका युरोप आणि जपानमध्ये आढळतो.
वॉशिंग्टन- एखादा लहानसा प्राणी संपूर्ण देशाचे फक्त लक्षच वेधून घेऊ शकतो असे नाही तर सर्व देशाचा जीव टांगणीला लावू शकतो याचा प्रत्यय अमेरिकन नागरिकांना नुकताच आला. रॅकून या लहानशा प्राण्याने मिनिसोटा राज्यातील एका उंच इमारतीवर चढाई करायला सुरुवात केली आणि हा रॅकून आता वरुन पडेल याची भीती सगळ्या अमेरिकेला वाटू लागली. त्याला वाचविण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले. बऱ्याच अवधीनंतर त्याला उतरवण्यात यश आल्या नंतर सगळ्या अमेरिकेचा अडकलेला जीव मोकळा झाला.
रॅकून हा मांजराहून थोड्या मोठ्या आकाराचा प्राणी असतो. एका रॅकूनने मिनिसोटा राज्यातील सेंट पॉल शहरातील यूबीएस प्लाझाच्या उंच भिंतीवर अचानक चढाई सुरु केली. थोड्याचवेळात हा संपूर्ण अमेरिकेत हा चर्चेचा विषय झाला. इंचा-इंचाने पुढे सरकणाऱ्या या रॅकूनमुळे अमेरिकन लोकांनी हातातली कामं टाकून टीव्ही, रेडिओ, ट्वीटरसमोर ठाण मांडले. ट्वीटरवर त्याच्या नावाने हॅशटॅगही सुरु झाला. रॅकूनचे प्राण वाचवावेत यासाठी धावा सुरु झाला तर काही लोकांनी त्याला कसे वाचवावे याचे उपायही सुचवले. पण रॅकून मात्र एकेक पाऊल वर सरकतच राहिला.
After a delicious meal of soft cat food, #mprraccoon has been caught and will be picked up by Wildlife Management. Goodbye friend! pic.twitter.com/twcBPpjOQk
— UBS Plaza (@ubs_plaza) June 13, 2018
हॉलिवूड अभिनेता जेम्स गन याने तर जो रॅकूनचे प्राण वाचवेल त्याला 1 हजार डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले. रॅकून मध्येच थांबायचा, थबकायचा. त्यामुळे लोकांना वाटायचं आता हा दमला असणार आता तो खाली पडणार. पण लोकांची अशी परिक्षा बघून रॅकून पुन्हा पावलं टाकायला लागायचा.
Here is the #mprraccoon being picked up by technicians from Wildlife Management Services just now. Taken away by truck to an "undisclosed location." pic.twitter.com/x0iMZhW7zd
— Tim Nelson (@timnelson_mpr) June 13, 2018
अखेर मध्यरात्रीस रॅकूनने सगळी चढाई पूर्ण केली आणि तो छतावर पोहोचला. त्याला वन्यजीव नियंत्रण विभागाने पकडून पिंजऱ्यामध्ये बंदिस्त केले. यूएसबी इमारतीच्या व्यवस्थापकांनी नंतर रॅकूनचे चित्र ट्वीट केले आणि लिहिले, 'कॅटफूडची मेजवानी दिल्यानंतर रॅकूनला पकडण्यात आले आहे.'