रघुपती राघवच्या गजरात अनावरण
By Admin | Published: March 15, 2015 01:45 AM2015-03-15T01:45:53+5:302015-03-15T01:45:53+5:30
जगाला सत्य, अहिंसा आणि शांततेचा संदेश देणारे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ््याचे ब्रिटनच्या पार्लमेंट स्क्वेअरमध्ये अनावरण करण्यात आले.
लंडन : जगाला सत्य, अहिंसा आणि शांततेचा संदेश देणारे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ््याचे ब्रिटनच्या पार्लमेंट स्क्वेअरमध्ये अनावरण करण्यात आले. रघुपती राघव राजा राम...हे गांधीजींचे आवडते भजन गात ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून आणि भारताचे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी ९ फुटी कास्य पुतळ्याचे अनावरण केले.
या ऐतिहासिक सोहळ्याला बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन, गोपाळकृष्ण गांधी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. ब्रिटनच्या पार्लमेंट स्क्वेअरमध्ये विन्स्टन चर्चिल आणि नेल्सन मंडेला या थोर व्यक्तींचेही पुतळे आहेत.
कोणत्याही पदावर नसलेले महात्मा गांधी हे पहिले असे व्यक्ती आहेत की, ज्यांचा पुतळा ब्रिटनच्या पार्लमेंट स्क्वेअरमध्ये उभारण्यात आला आहे. गांधीजींची शिकवण आजही प्रासंगिक आहे.
हा पुतळा म्हणजे सर्वात जुन्या आणि सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशांदरम्यानच्या खास मैत्री व गांधीजींच्या संदेशांच्या वैश्विक सामर्थ्याचे प्रतीक होय. या प्रसिद्ध चौकात त्यांचा पुतळा उभारून आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. (वृत्तसंस्था)
ब्रिटिश शिष्टाचाराचे हे भावनात्मक प्रतीक आहे. पारंपरिकदृष्ट्या विरोधक समजल्या जाणाऱ्या व्यक्तीचा पुतळा उभारून त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला आहे.
ब्रिटनमधील सर्वात महत्त्वाच्या ठिकाणी गांधीजींचा पुतळा उभारून ब्रिटनने दाखविलेली उदारता म्हणजे ब्रिटिश लोकशाहीचे एक मोठे योगदान होय.
भावी पिढीला गांधीजींची ही प्रतिमा सदोदित प्रेरणा देत राहील, असे भावोद्गार अरुण जेटली यांनी काढले.