आता भूतानही भारताशी रेल्वेने जोडले जाणार, पाच मार्गांचा अहवाल सादर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2018 11:46 AM2018-05-11T11:46:20+5:302018-05-11T11:57:11+5:30
अॅक्ट इस्ट पॉलिसीनुसार केंद्र सरकार ईशान्य भारतातील राज्यांमार्फत पूर्व आणि दक्षिण आशियाई देशांशी संपर्क वाढवत आहे.
नवी दिल्ली- दक्षिण आशियाई देशांशी ईशान्य भारताच्या मार्गाने संबंध वृद्धींगत करण्यासाठी केंद्र सरकारने अॅक्ट इस्ट धोरण अवलंबले आहे. या ईशान्य भारतीय राज्यांमधून नेपाळ, बांगलादेश, म्यानमारला जाण्यास रेल्वेमार्ग बांधण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. त्यामध्ये भूतानला भारताशी रेल्वेने जोडण्यास संभाव्य पाच मार्गांचा अहवाल ईशान्य सीमावर्ती रेल्वेमार्ग विभागाने परराष्ट्र मंत्रालयाला सादर केला आहे. असा अभ्यास करुन प्रस्ताव देण्याची विनंती परराष्ट्र मंत्रालयानेच ईशान्य सीमावर्ती विभागाला केली होती.
या अहवालात पाच संभाव्य मार्गांचा विचार केला असून ते सर्व पश्चिम बंगाल राज्यातून जात आहेत. पहिल्या ५७ किमी लांबीच्या मार्गाची सुरुवात पश्चिम बंगालमधील कोक्राझार येथे होईल आणि तो मार्ग भूतानमधील गेलेफू या गावाला जोडेल. दुसरा मार्ग ५१.१५ किमीचा असून तो मार्ग पश्चिम बंगालमधील पाथसाला येथे सुरु होईल आणि भूताननधील नागलाम येथे संपेल. तिसरा मार्ग पश्चिम बंगालमधील रांगिया आणि भूतानमधील समद्रुजोंक्जार यांना जोडेल, हा मार्ग ४८ किमीचा असेल. चौथा रेल्वेमार्ग २३ किमीचा असून तो पश्चिम बंगालमधील बनारहाट पासून सुरु होऊन भूतानमधील सामस्ते येथे संपेल. पाचवा मार्ग केवळ १७ किमीचा असून तो पश्चिम बंगालमधील हासिमारा आणि भूतानमधील फ्युनत्शोंगलिंग यांना जोडेल. हे मार्ग तांत्रिकदृष्ट्या पश्चिम बंगालमध्ये असले तरी त्याचा खरा फायदा ईशान्य भारताच्या विकासासाठी आणि भारत- भूतान संबंध अधिक दृढ होण्यासाठी होतील.
सध्या भारत आणि भूतान यांच्यामध्ये रेल्वेमार्ग नाही. अहवालात दिलेल्या पाच मार्गांचा विचार करुन एका मार्गाचे बांधकाम होईल आणि भूतान भारताशी रेल्वेनेही जोडले जाईल. केंद्र सरकारने ईशान्य भारतावर विशेष लक्ष केंद्रित करुन अॅक्ट इस्ट योजनेवर भर दिला आहे. काही दिवसांपुर्वीच परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ईशान्य भारतातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली होती. इतकी वर्षे सिक्किम राज्य रेल्वेमार्ग आणि विमानतळापासून वंचित राहिले होते. ते राज्यही रेल्वेने लवकरच जोडले जात असून पाक्योंग येथे विमानतळ बांधून तयार झाला आहे. १९७५ साली सिक्किम भारताचे २२ वे राज्य म्हणून भारतात सामिल झाले. आता ४३ वर्षांनंतर तेथे रेल्वेमार्ग आणि विमानतळ तयार होत आहेत. गेल्यावर्षी डोकलाम येथेे तयार झालेल्या पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर भारताने भूतानला रेल्वेमार्गाने जवळ आणणेे आणि सिक्किममध्ये वाहतूक मार्ग सुधारणे, विमानतळ बांधणे ही आश्वासक वाटचाल म्हणावी लागेल. तसेच भारतातील सर्वात लांब रेल्वे आणि रस्ते पूल आसाम व अरुणाचल प्रदेश यांच्या दरम्यान ब्रह्मपुत्रा नदीवर बांधला आहे, त्याचे लवकरच उद्घाटन होईल..या पुलाचाही फायदा चीन सीमेवरील भारतीय सैनिकांना होईल.