भीषण! 'या' देशात पावसाचा प्रकोप; फक्त ८ तासांत पडला वर्षभराचा पाऊस, १६ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 11:08 IST2025-03-10T11:07:51+5:302025-03-10T11:08:33+5:30
पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्यात लोक वाहून गेले असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. याशिवाय, बचाव पथक दोन मुलींसह अनेक बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

भीषण! 'या' देशात पावसाचा प्रकोप; फक्त ८ तासांत पडला वर्षभराचा पाऊस, १६ जणांचा मृत्यू
अर्जेंटिनामध्ये पावसाचा प्रकोप पाहायला मिळाला आहे. येथे पावसामुळे १६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण बेपत्ता आहेत. अधिकाऱ्यांनी रविवारी (९ मार्च) ही माहिती दिली. शुक्रवारी बाहिया ब्लांका शहरात सुरू झालेल्या पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्यात लोक वाहून गेले असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. याशिवाय, बचाव पथक दोन मुलींसह अनेक बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
१,४५० हून अधिक लोकांना काढलं बाहेर
द मिंटच्या रिपोर्टनुसार, राजधानी ब्यूनस आयर्सच्या दक्षिणेस असलेल्या या शहरातून बचाव पथकांनी आतापर्यंत १,४५० हून अधिक लोकांना बाहेर काढलं आहे. बाहेर काढण्यात आलेल्यांमध्ये स्थानिक रुग्णालयातील रुग्णांचाही समावेश होता.
१६ जणांचा मृत्यू
बहिया ब्लँका येथे अलिकडच्या काळात सुमारे ३०० मिमी पाऊस पडला आहे, तर मासिक सरासरी १२९ मिमी आहे. पुढील ७२ तासांत पाऊस पडण्याची कोणतीही आशा नाही. शुक्रवारी मृतांचा आकडा १० होता, तो रविवारी १६ वर पोहोचला, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
वाढू शकते मृतांची संख्या
महापौर कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, अधिक जीवितहानी होण्याची शक्यता आहे. या शहराची लोकसंख्या तीन लाख पन्नास हजार आहे. हे शहर राजधानी ब्यूनस आयर्सपासून ६०० किलोमीटर नैऋत्येस आहे. बेपत्ता मुली पुराच्या पाण्यात वाहून गेल्या असण्याची शक्यता आहे. वेगाने वाहणाऱ्या पाण्यात गाड्या अडकल्याने पूरग्रस्त रस्त्यांवर किमान पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
फक्त ८ तासांत सुमारे ४०० मिमी पाऊस
प्रांतीय सुरक्षा मंत्री जेवियर अलोन्सो यांच्या मते, शुक्रवारी सकाळी पाऊस सुरू झाला. या काळात फक्त ८ तासांत सुमारे ४०० मिमी पाऊस पडला. वर्षभर येथे इतका पाऊस पडतो. शनिवारी बुलरिच आणि संरक्षण मंत्री लुई पेट्री यांनी बाधित भागाला भेट देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना लोकांच्या रोषाचा सामना करावा लागला.