रईसी यांच्यावर गुरुवारी होणार अंतिम संस्कार, लाखो लोक अंत्ययात्रेत सामील होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 02:32 PM2024-05-22T14:32:52+5:302024-05-22T14:34:03+5:30
हेलिकॉप्टर दुर्घटना झाली त्या ठिकाणापासून तबरीझ शहर जवळ आहे. तेथून हे मृतदेह कोम या शहरात नेले जातील. त्यानंतर ते तेहरान येथे नेले जाणार आहेत.
दुबई : हेलिकॉप्टर दुर्घटनेत मरण पावलेले इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी, परराष्ट्रमंत्री हुसैन अमीराब्दोल्लाहियान, काही अधिकारी, अंगरक्षक यांचे मृतदेह असलेल्या शवपेट्या तबरीझ शहरात एका ट्रकवर ठेवण्यात आल्या. त्यावेळी हजारो शोकाकुल नागरिकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. हे मृतदेह तेहरान येथे नेले जातील. त्यानंतर रईसी यांची गुरुवारी बिरजंद या जन्मगावी अंत्ययात्रा काढली जाईल व मश्शाद या शहरात त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील.
हेलिकॉप्टर दुर्घटना झाली त्या ठिकाणापासून तबरीझ शहर जवळ आहे. तेथून हे मृतदेह कोम या शहरात नेले जातील. त्यानंतर ते तेहरान येथे नेले जाणार आहेत. राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी व अन्य काही लोकांच्या अपघाती मृत्यूमुळेइराणवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या हेलिकॉप्टरला रविवारी रात्री अपघात झाला होता. रईसी यांच्या अंत्यविधीची इराण सरकारने तयारी सुरू केली असून, त्याला काही लाख लोक उपस्थित राहतील, असा अंदाज आहे.
महिलांवरील निर्बंधाने जनतेमध्ये नाराजी
इराणमधील रईसी सरकारच्या धोरणांविरोधात मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली होती. महिलांवर लादण्यात आलेल्या निर्बंधांबद्दल त्या देशातील जनतेत नाराजी आहे.
राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूबद्दल आनंद व्यक्त करणाऱ्या तसेच त्या हेतूने कोणताही समारंभ आयोजित करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा इराण सरकारने दिला आहे.
चौकशीत मदत; अमेरिकेचा नकार
- इब्राहिम रईसी व अन्य काही लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या हेलिकॉप्टरच्या चौकशीमध्ये मदत करावी, ही इराणने केलेली विनंती अमेरिकेने अमान्य केली नाही.
- काही अपरिहार्य कारणांमुळे आम्ही इराणच्या विनंतीस नकार कळविला असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. रईसी यांच्या निधनाबद्दल अमेरिकेने तीव्र शोक व्यक्त केला.