अमेरिकेत राज ठाकरेंचं मराठमोळं स्वागत; बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाच्या संमेलनाला हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 09:56 AM2024-06-27T09:56:28+5:302024-06-27T09:57:13+5:30

राज ठाकरे सहकुटुंब अमेरिकेत मराठी संमेलनाच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी पोहचले आहेत. 

Raj Thackeray welcomed in America; Attended the Programme of Brihanmaharashtra Marathi Mandal | अमेरिकेत राज ठाकरेंचं मराठमोळं स्वागत; बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाच्या संमेलनाला हजेरी

अमेरिकेत राज ठाकरेंचं मराठमोळं स्वागत; बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाच्या संमेलनाला हजेरी

सान होजे - अमेरिकेतील सान होजे इथं बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या वतीने अधिवेशन घेण्यात येत आहे. या अधिवेशनाला जगभरातील मराठी बांधव एकत्रित येणार आहेत. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेदेखील कुटुंबासह अमेरिकेत पोहचले. त्याठिकाणी ठाकरे कुटुंबाचं मराठमोळं स्वागत करण्यात आले. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

सान होजे येथील मेरियट हॉटेलमध्ये राज ठाकरे, पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगी उर्वशी, मुलगा अमित, सून मिताली आणि नातू कियान ठाकरे पोहचले. त्यावेळी संमेलनाचे मुख्य संयोजक प्रकाश भालेराव आणि सुजाता भालेराव यांनी राज ठाकरे-शर्मिला ठाकरे यांचे औक्षण करत मराठमोळं स्वागत केले. तर बृन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष संदीप दीक्षित यांनी मंत्रोच्चाराने त्यांचे स्वागत करताना व्हिडिओत पाहायला मिळते. राज ठाकरेंच्या स्वागतासाठी सगळेच सदस्य खूप उत्सुक होते. त्याचसोबत हॉटेलमधील इतर लोकही मराठमोळ्या पद्धतीचं स्वागत पाहून भारावून गेले.

Apple, META आणि गुगलच्या मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या सान होजे कन्व्हेक्शन सेंटरच्या हॉलमध्ये उत्तर अमेरिकेतल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाला गुरुवारपासून सुरूवात होत आहे. भारताबाहेरच्या या सर्वात मोठ्या संमेलनात मराठी कला, संस्कृती, परंपरा आणइ आणि पुरणपोळीपासून कडक चहापर्यंत खाण्यापिण्याची लयलूट आहे. तब्बल ५० लाख डॉलर्सचं बजेट असलेले हे आजवरचे सर्वात भव्य संमेलन असून यासाठी जगभरातील ६ हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. 

संमेलनात काय आहे खास?

सुमारे ३५० स्वयंसेवकांच्या ३० समित्या असून गेल्या २ वर्षापासून अखंडपणे काम सुरू आहे. बे एरिया मराठी मंडळ, ईस्ट बे मराठी मंडळ, कला, स्वरसुधा, नाट्यसरगम, बसंत बहार या स्थानिक संस्थांनी एकत्रित या अधिवेशनाचं संयुक्त आयोजन केले आहे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे, माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर, संगीतकार अजय अतुल यांच्यासह अनेक मान्यवरांचा सहभाग राहणार आहे. 

सत्तरच्या दशकात अमेरिकेत येऊन पुढे स्वकर्तृत्वाने सिलिकॉन व्हॅलीवर अधिराज्य गाजवलेल्या प्रकाश भालेराव यांच्यासारख्या ख्यातनाम ज्येष्ठ उद्योजकांपासून पंचविशीतल्या तरूण अभियंत्यांपर्यंत सर्व पिढ्यांमधली मराठी माणसे गेली २ वर्ष या आयोजनासाठी झटत आहेत.  
 

Web Title: Raj Thackeray welcomed in America; Attended the Programme of Brihanmaharashtra Marathi Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.