झाकीर नाईक यांना राजे फैजल पुरस्कार
By admin | Published: February 6, 2015 02:27 AM2015-02-06T02:27:09+5:302015-02-06T02:27:09+5:30
भारतीय वंशाचे इस्लामिक विद्वान डॉ. झाकीर ए. नाईक यांना इस्लामच्या सेवेबद्दल प्रतिष्ठेचा राजे फैजल आंतरराष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे.
दुबई : भारतीय वंशाचे इस्लामिक विद्वान डॉ. झाकीर ए. नाईक यांना इस्लामच्या सेवेबद्दल प्रतिष्ठेचा राजे फैजल आंतरराष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे. हस्तलिखित अरबी प्रमाणपत्र, सोन्याचे पदक व ७ लाख ५० हजार रियाल ( सौदीचे चलन) रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मक्काचे गव्हर्नर युवराज खालेद अल-फैसल यांनी रियाद येथे या पुरस्कारांची घोषणा केली.
विविध धर्मांच्या तुलनात्मक अभ्यासावर प्रभुत्व असलेले डॉ. झाकीर हे इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन आॅफ इंडियाचे संस्थापक आहेत. इस्लामच्या प्रशंसनीय सेवेबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली. विज्ञान श्रेणीतील पुरस्कार स्वीस फेडरल इन्स्टिट्यूटचे प्रोफेसर ग्राटझेल यांना घोषित करण्यात आला. सौर ऊर्जा रूपांतरणासाठी फोटो इलेक्ट्रोकेमिकल तंत्र विकसित केल्याबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली. ग्राटझेल व रसायनशास्त्राचे प्रोफेसर ओमर मवान्नेस यांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला. इस्लामिक अभ्यासासाठीचा पुरस्कार मदिना विकास प्राधिकरणात सल्लागार म्हणून कार्यरत असलेले डॉ. अब्दुल अजीज बिन अब्दुल रहमान काकी यांना जाहीर झाला. वैद्यकीय क्षेत्रासाठीचा पुरस्कार अमेरिकेतील प्रो. जेफ्री इव्हान गॉर्डन यांना मिळाला. (वृत्तसंस्था)