परदेशातही राम मंदिर सोहळ्याची धूम; अमेरिकेच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये वाटले पेढे-लाडू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 11:31 AM2024-01-22T11:31:46+5:302024-01-22T11:33:40+5:30
Ram Mandir Ayodhya: राम मंदिर सोहळ्याचे थेट प्रक्षेपण परदेशात केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
Ram Mandir Ayodhya: भारतातील राम मंदिर सोहळ्याची धूम परदेशातही पाहायला मिळत आहे. संपूर्ण भारतात जय श्रीराम असा रामनामाचा जयघोष मोठ्या प्रमावर होत आहेत. केवळ भारतात नाही, तर परदेशातील रामभक्तांमध्ये राम मंदिर सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. राम मंदिर सोहळ्याच्या निमित्ताने अनेकविध कार्यक्रम परदेशातही आयोजित करण्यात आले होते. राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील टाइम्स स्क्वेअर येथे लाडू-पेढे वाटण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
केवळ अमेरिका नाही तर, कॅनडा, दुबई, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड यासह अनेकविध ठिकाणी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेय. सुंदरकांड तसेच रामचरितमानस यांचे पठण केले जात आहे. शोभायात्रा, रॅली काढल्या जात आहेत. ओव्हरसिज फ्रेंड्स ऑफ राम मंदिर या संस्थेच्या सदस्यांनी न्यूयॉर्क येथील टाइम्स स्क्वेअर येथे लाडू वाटून राम मंदिर सोहळ्याचा आनंद साजरा करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष धन्यवाद
अमेरिकेतील लोक विशेष उत्साहित आहेत. मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा केला जात आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष धन्यवाद. असा अद्भूत दिवस आयुष्यात पाहायला मिळेल, अशी आशाच कधी केली नव्हती. टाइम्स स्क्वेअरचा परिसर राममय झाला आहे, अशी प्रतिक्रिया या संस्थेतील एका सदस्याने दिली. तसेच अमेरिकेत होणाऱ्या कार्यक्रमांबद्दल तेथे उपस्थित भारतीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. प्रभू श्रीराम वनवासानंतर परतत असल्याचे अनेकांनी सांगितले. जग पूर्णपणे राममय झाले आहे. येथील वातावरण पाहून असे वाटते की, भारतापासून दूर नसून अयोध्येत आहोत. हा दिवस दिवाळीपेक्षा वेगळा नाही. अमेरिकेतील ११०० मंदिरांमध्ये सुंदरकांड आणि रामचरितमानसाचे पठण केले जात आहे. न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर ते बोस्टनपर्यंत, वॉशिंग्टन डीसी, लॉस एंजेलिस आणि सॅन फ्रान्सिस्को येथे कार्यक्रम आयोजित केले जातील, जे भारतातील उत्सवांच्या अनुषंगाने आयोजित केले जातील.
दरम्यान, राम मंदिर सोहळ्याचे थेट प्रक्षेपण परदेशात केले जाणार आहेत. टेक्सास, न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि जॉर्जियासह अमेरिकेतील अनेक ठिकाणी राम मंदिर सोहळा दाखवला जाणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने शोभायात्रा काढली जाणार आहे.