रामलला मंदिरात विराजमान, भारतात जल्लोष; पाकिस्तानात काय प्रतिक्रिया उमटल्या? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 02:12 PM2024-01-22T14:12:21+5:302024-01-22T14:54:54+5:30
राम मूर्ती प्राणप्रतिष्ठेची फक्त भारतातच चर्चा नसून जगभरातील अनेक देशांप्रमाणेच पाकिस्तानातही राम मंदिराबाबत बोललं जात आहे.
Ram Mandir News: गेल्या अनेक वर्षांच्या संघर्षानंतर भारतात प्रभू राम त्यांच्या मूळ स्थानी प्रेम आणि सन्मानाने विराजमान झाले आहेत. हीच भावना देशभरात असल्याने हा सोहळा दिवाळी म्हणून साजरा करण्यात येत आहे. देशातील प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात हा सोहळा साजरा करण्यात येत आहे. अनेक वर्षांपासून तात्पुरत्या मंदिरात ठेवण्यात आलेली रामललाची मूर्ती आज दुपारी मंदिरात स्थापन होणाऱ्या नवीन मूर्तीसमोर ठेवण्यात आली आहे. राम मूर्ती प्राणप्रतिष्ठेची फक्त भारतातच चर्चा नसून जगभरातील अनेक देशांप्रमाणेच पाकिस्तानातही राम मंदिराबाबत बोललं जात आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर आज पाकिस्तानी माध्यमांत अनेक बातम्या आणि लेख छापण्यात आले आहेत.
पाकिस्तानातील प्रमुख वृत्तपत्रांपैकी एक असलेल्या 'द डॉन'मधील एका लेखात म्हटलं आहे की, 'ज्या जागेवर पाच शतकांपासून बाबरी मशीद होती, तिथं आता राम मंदिर उभारलं जात आहे. राम मंदिरच्या चारही बाजूने व्हॅटिक सिटीसारखं शहर उभं राहणार आहे.'
दुसरीकडे 'पाकिस्तान टुडे' या दैनिकानेही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबाबत लिहिलं आहे की, "सोमवारी अशा जागेवर भव्य मंदिराचं उद्घाटन होतंय ज्या जागेला लाखो भारतीय रामाचं जन्मस्थळ मानतात. नरेंद्र मोदींच्या भाजप या हिंदुत्ववादी पक्षाने राम मंदिराचं आश्वासन दिलं होतं आणि त्यांच्यासाठी हा नेहमीच एक राजकीय मुद्दा राहिलेला आहे. याच मुद्द्याने भाजपला सत्तेत येण्यास मदत केली आहे."
दरम्यान, "भारतात काही महिन्यांत होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपच्या प्रचाराची सुरुवात म्हणूनही राम मंदिर सोहळ्याकडे पाहिलं जात आहे," असा उल्लेख 'पाकिस्तान टुडे' दैनिकाने आपल्या बातमीत केला आहे.