'रिअल लाइफ'मधील 'रँचो' - सोनम वांगचुक यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 04:40 PM2018-07-26T16:40:45+5:302018-07-26T16:41:33+5:30
आशिया खंडातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर झाली आहे.
मनीला - आशिया खंडातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर झाली असून, पुरस्कार विजेत्यांमध्ये दोन भारतीयांचा समावेश आहे. लडाखमध्ये मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेले सोनम वांगचुक आणि भीक मागणाऱ्या मानसिक रुग्णांवर उपचार करून त्यांना पुन्हा कुटुंबीयांची भेट घडवणाऱ्या डॉक्टर भारत वटवानी यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
थ्री इडियट्स चित्रपटात रँचो हे पात्र ज्या व्यक्तीवरून रंगवण्यात आले होते ते सोनम वांगचूक यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे. सोनम वांगचूक यांनी 1988 मध्ये इंजिनियरिंगची पदवी घेतल्यानंतर स्टुडंट्स एज्युकेशन अँड कल्चरल मुव्हमेंट ऑफ लडाख (एसईसीएमओएल) ची स्थापना केली होती. तसेच लडाखी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली . 1994 मध्ये वांगचूक यांनी ऑपरेशन न्यू होप सुरू केले होते. या संस्थेकडे 700 प्रशिक्षित शिक्षक आणि 1000 व्हीईसी लिडर्स होते.