रशियात बलात्कारी-खुनी बनलेत ‘देशप्रेमी’!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 10:03 AM2023-11-13T10:03:54+5:302023-11-13T10:04:20+5:30
ब्रेकअप झाल्यावर किंवा कोणत्याही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दोन्ही जोडीदारांचं वाजल्यावर बहुतांश वेळा पुरुष जोडीदाराचा जो तीळपापड होतो आणि तो सुडाच्या भावनेनं जो बेभान होतो, त्याचंच स्पष्ट चित्र इथेही दिसून आलं.
रशियामधली काही महिन्यांपूर्वीची घटना. एक प्रेमी जाेडपं. त्यांची नजरानजर झाली, त्यानंतर पहिली भेट झाली. एकमेकांबरोबर ते फिरू लागले. गार्डन, निसर्गरम्य ठिकाणं, हॉटेलिंग सुरू झालं. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. प्रेमाचे संदेश मोबाइलवर फिरू लागले. संदेशांच्या या देवाणीघेवाणीत, गप्पांमध्ये रात्रीचा दिवस होऊ लागला. दोघांनाही एकमेकांशिवाय एक क्षणही नकोसा झाला. जिथे पाहावं तिथं दोघंही सोबत... हे दोघं आता लग्न करणार किंवा आयुष्यभर सोबत राहाणार, याची लोकांनाही खात्री पटली...
पण अचानक, काही दिवसांनी बिनसलं. दोघं एकमेकांपासून दूर झाले. त्यांच्या भेटीगाठी, एकमेकांशी बोलणं, गप्पा बंद झाल्या. बाहेर फिरणं तर पूर्णत: थांबलं. दोघांचंही आयुष्य जणू दोन वेगवेगळ्या दिशांनी गेलं... ज्या दोघांचा एक क्षणही एकमेकांशिवाय जात नव्हता, तेच दोघं आता एकमेकांचं तोंड काय, सावलीपासूनही कायमचे दूर झाले! असं झालं तरी काय आणि त्यांच्यात बिनसलं तरी कशावरून?
सुरुवातीला तर कोणालाच काही कळेना; पण दोघांनी एकमेकांना कायमचं टाकलं एवढं मात्र खरं... या दोघांतल्या प्रेमी तरुणाचं नाव व्लादिस्लाव कानयुस आणि त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव वेरा पेख्तेलेवा. जसजसे दोघे अधिकाधिक जवळ आले, तसतसा एकमेकांचा स्वभावही त्यांना कळायला लागला. त्यातही वेराला लक्षात आलं, ज्या व्लादिस्लाववर आपण प्रेम केलं, तो व्लादिस्लाव हा नाहीच. त्याचं दाखवायचं रूप वेगळं आणि प्रत्यक्षातला व्लादिस्लाव वेगळाच आहे! तिनं त्याला एकदा, दोनदा, चारदा, दहादा... समजावून सांगितलं; पण ना व्लादिस्लावचा स्वभाव बदलला, ना त्यानं तिचं म्हणणं गांभीर्यानं घेतलं. शेवटी तिनं ठरवलं, ब्लादिस्लावला आता कायमचा रामराम ठोकायचा! तिनं त्याच्याशी संबंध तोडले! त्यांचं ब्रेकअप झालं!
ब्रेकअप झाल्यावर किंवा कोणत्याही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दोन्ही जोडीदारांचं वाजल्यावर बहुतांश वेळा पुरुष जोडीदाराचा जो तीळपापड होतो आणि तो सुडाच्या भावनेनं जो बेभान होतो, त्याचंच स्पष्ट चित्र इथेही दिसून आलं. व्लादिस्लावनं वेराला अनेकदा मेसेज केले, फोन केले; पण तिनं त्याला काहीही भाव दिला नाही, हिंग लावून त्याला विचारलं नाही. त्याचाही त्याला प्रचंड राग आला. शेवटी एके दिवशी रागाच्या भरात ती जिथे राहते, त्याठिकाणी तो गेला, बऱ्या बोलानं माझ्याशी सुरू असलेलं नातं पुन्हा चालू कर, सुरू ठेव म्हणून तिला धमकावलं, तरीही तिनं ‘नाही’च म्हटल्यावर त्यानं तिच्यावर बलात्कार केला आणि चाकूनं तिच्यावर तब्बल १११ वार केले! अर्थातच या हल्ल्यात वेराचा जागीच मृत्यू झाला!
आश्चर्याची गोष्ट म्हणजे व्लादिस्लाव जेव्हा वेरावर अत्याचार करीत होता, चाकूनं तिच्यावर हल्ले करीत होता, त्यावेळी जिवाच्या आकांतानं ती ओरडत होती. इमारतीत राहणाऱ्या लोकांनाही तिच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या, त्यांनी दरवाजा उघडण्याचा, तोडण्याचा प्रयत्न केला; पण त्यात त्यांना यश आलं नाही. दुसरीकडे इमारतीतले काही लोक पोलिसांना बोलवण्यात व्यग्र होते. त्यांनी अनेकदा पोलिसांना फोन केला; पण पोलिसांनी त्यांना कोणताही प्रतिसाद दिला नाही. दरम्यानच्या काळात व्लादिस्लाव वेरावर अत्याचार करून आणि तिचा खून करून पळूनही गेला, तरीही पोलिस तिथे आलेले नव्हते; पण शेवटी व्लादिस्लावर गुन्हा सिद्ध झाला आणि या गुन्ह्यात त्याला १७ वर्षांची शिक्षा झाली!
मात्र, कहानीं में खरा ट्विस्ट पुढेच आहे. याच खुनी ब्लादिस्लावला रशियानं आता ‘मुक्त’ केलं आहे. एवढंच नाही, त्याला सैनिक केलं आहे. वर्दीतले आपले फोटो तो सोशल मीडियावर ऐटीत टाकतो आहे आणि लोकांची वाहवाही मिळवतो आहे! पण का केलं रशियानं असं? रशियानं त्याला तुरुंगातून काढलं आणि युक्रेनबरोबरच्या युद्धात लढाईसाठी पाठवून दिलं आहे. केवळ व्लादिस्लावच नाही, तर रशियातले असे अनेक खतरनाक गुंड आहेत, ज्यांना आता रशियानं युक्रेनबराेबरच्या युद्धात लढाईसाठी पाठवलं आहे. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या आदेशानं कैद्यांपुढे दोन पर्याय ठेवण्यात आले, एकतर रशियाच्या जेलमध्येच वर्षानुवर्षे सडत राहा, नाही तर ‘देशप्रेमी’ बनून देशासाठी युक्रेनमध्ये जाऊन लढा! ज्यांनी युक्रेनबरोबर लढाईचा पर्याय स्वीकारला, त्यानं तुरुंगातून तातडीनं मुक्त करण्यात आलं!
कैद्यांपुढे ठेवले दोन पर्याय!
रशियाच्या अनेक सैनिकांनाही हे युद्ध नको आहे. बळजबरीनं आपल्याला लढायला पाठवतील म्हणून अनेक तरुण आणि सैनिकांनी आधीच आपला देश सोडला आहे. त्यामुळे रशियाला सैनिकांची कमतरता जाणवत आहे. त्यामुळेच कैद्यांपुढे हा पर्याय ठेवण्यत आला आहे; पण त्यामुळेही नागरिक नाराज झाले आहेत. ज्यांना गुन्हे केले, त्यांनाच तुम्ही ‘देशप्रेमी’ म्हणून कसे काय मिरवता म्हणून सरकारला खडे बोल सुनावले आहेत!