मिगोस बँडमधील प्रसिद्ध रॅपर टेकऑफची गोळ्या झाडून हत्या, जागेवरच सोडला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 09:02 PM2022-11-01T21:02:37+5:302022-11-01T21:03:27+5:30
टेकऑफसोबत असलेल्या इतर दोघांवरही गोळीबार झाला आहे.
Rapper Takeoff: मिगोस बँडमधील प्रसिद्ध रॅपर टेकऑफची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. टेकऑफ रॅपर क्वावो आणि ऑफसेटसोबत मिगोस बँड नावाने परफॉर्म करायचा. 28 वर्षीय टेकऑफचे खरे नाव किर्शनिक खारी बॉल होते. ह्यूस्टनमधील एका बॉलिंग ऐलीमध्ये डायस खेळत असताना टेकऑफवर गोळीबीर झाला.
क्वावो थोडक्यात बचावला
गोळीबार झाल्यानंतर टेकऑफचा घटनास्थळीच मृत्यू झाला. टेकऑफसोबत असलेल्या इतर दोघांवरही गोळीबार झाला, त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. सध्या जखमींवर उपचार सुरू आहे. सुदैवाने टेकऑफसोबत असलेला बँडमधील सदस्य क्वावो थोडक्यात बचावला. टेकऑफच्या हत्येनंतर ट्विटरवर अनेक मित्र आणि चाहत्यांनी टेकऑफला श्रद्धांजली वाहिली.
अनेकांनी श्रद्धांजली वाहिली
बॉक्सर क्रिस यूबँक जूनियरने सोशल मीडिया स्टोरीवर लिहिले की, "टेकऑफ खून डाउन टू अर्थ आणि कूल ड्यूड होता. अजून एका कृष्णवर्णीय रॅपरची कुठल्याही कारणाशिवाय हत्या होतीये, यावर माझा विश्वास बसत नाहीये. इंडस्ट्रीमध्ये आता बदल घडवून आणण्याची गरज आहे." ट्विच स्ट्रीमर एडिन रॉसने लिहिले की, "टेकऑफ रेस्ट इन पीस. मी नुकतेच त्याच्याशी बोललो होतो. मला विश्वास होत नाहीये. मी अजूनही धक्क्यात आहे."
कोण होता टेकऑफ?
टेकऑफचा जन्म 1994मध्ये जॉर्जियाच्या लॉरेंसविलेमध्ये झाला. त्याने 2008मध्ये क्वावो आणि ऑफसेट म्हणजेच आपला काका आणि चुलत भावासोबत रॅपिंगची सुरुवात केली. 2011 मध्ये तिघांनी जुग सीजन रिलीज केला. मिगोसद्वारे त्यांचा पहिला मिक्सटेप रिलीज झाला. गेल्या 12 सप्टेंबरला PNB रॉक्स नावाच्या रॅपरचीही गोळी झाडून हत्या झाली होती. विशेष म्हणजे, गेल्या चार दशकांमध्ये अनेक कृष्णवर्णीय रॅपर्सच्या गोळ्या झाडून हत्या झाल्या आहेत. यात प्रसिद्ध रॅपर ट्यूपाक शकूर(मृत्यू 1996) आणि पंजाबी रॅपर सिद्धू मूसेवाला यांचाहीसमावेश आहे.