तब्बल 363 कोटी रुपयांना विकला गेला हा दुर्मीळ हिरा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 05:27 PM2018-11-14T17:27:23+5:302018-11-14T17:28:04+5:30
एका लिलावामध्ये 19 कॅरेटचा दुर्मीळ गुलाबी हिरा तब्बल 363 कोटी रुपयांना विकला गेला.
नवी दिल्ली - स्वीत्झर्लंडमध्ये झालेल्या एका लिलावामध्ये 19 कॅरेटचा दुर्मीळ गुलाबी हिरा तब्बल 363 कोटी रुपयांना विकला गेला. स्वीत्झर्लंडमधी ल जिनेव्हा येथे मंगळवारी या लिलावाचे आयोजन करण्यात आले होते. ब्रिटिश ऑक्शन हाऊस ख्रिस्टियनने हा लिलाव केला. या लिलावामध्ये प्रसिद्ध जवाहिर हॅरी विन्स्टन यांनी 5 कोटी डॉलर (सुमारे 363 कोटी रुपये) एवढी बोली लावून हा हिरा खरेदी केला. याबरोबरच हा हिरा आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक बोली लागलेला हिरा ठरला आहे.
गतवर्षी 15 कॅरेटच्या एका गुलाबी हिऱ्याला हाँगकाँगमध्ये झालेल्या लिलावात सुमारे 3 कोटी 25 लाख डॉलर एवढी किंमत मिळाली होती. त्यावेळी या हिऱ्यासाठी 21 लाख 76 हजार डॉलर प्रति कॅरेट एवढी विक्रमी बोली लागली होती. हा हिरा 100 वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेमधील एका खाणीमध्ये सापडला होता.
ब्रिटिश ऑक्शन हाऊस ख्रिस्टियनच्या ज्वेलरी विभागाचे प्रमुख राहुल कदाकिया यांनी हा हिरा जगातील सर्वोत्तम हिऱ्यांपैकी एक असल्याचे सांगितले. सुरुवातीला हा हिरा ओपनहायमर कुटुंबीयांकडे होता. त्यांनी अनेक वर्षांपर्यंत डी. बीयर्स डायमंड मायनिंग कंपनीचे संचालन केले होते. यापूर्वी 19 कॅरेटच्या पिंक हिऱ्याची कधीही विक्री झालेली नाही. आतापर्यंत 10 कॅरेटहून अधिक कॅरेटच्या केवळ चार पिंक हिऱ्यांची विक्री झालेली आहे.