इंग्लंडमधली रतन टाटांची टाटा स्टील कंपनी चौकशीच्या फे-यात
By admin | Published: April 8, 2016 04:36 PM2016-04-08T16:36:08+5:302016-04-08T16:45:34+5:30
रतन टाटांची इंग्लंडमधली कंपनी टाटा स्टीलची स्थानिक पोलीस चौकशी करत आहेत.
ऑनलाइन लोकमत
इंग्लंड, दि. ८- रतन टाटांची इंग्लंडमधली कंपनी टाटा स्टीलची स्थानिक पोलीस चौकशी करत आहेत. टाटा स्टीलचे कर्मचारी स्टीलच्या उत्पादनात भेसळ करून बनावट प्रमाणपत्र देत असल्याचा इंग्लंडच्या पोलिसांनी आरोप केला आहे. या प्रकरणाची इंग्लंडचे पोलीस अधिकारी अधिक तपास करत असल्याचं वृत्त डेली मेल या वर्तमानपत्रानं दिलं आहे. 500 ग्राहकांशी लागेबांधे असलेल्या टाटा स्टीलच्या जवळपास 9 कामगारांना या भेसळप्रकरणी निलंबित करण्यात आलं आहे.
त्यामुळे बीएई आणि रोल्स रॉयस या कंपन्या प्रभावित झाल्या आहेत. मात्र या प्रकरणाची चौकशी साध्या पद्धतीनं करणं अपेक्षित असतानाही गुन्हेगारी पार्श्वभूमीनुसार या कंपनीतल्या कामगारांची चौकशी केली जाते आहे. मुंबईत झालेल्या एका बैठकीत रतन टाटांनी इंग्लंडमधला टाटा स्टीलचा सर्व व्यवसाय विकण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलं होतं. इंग्लंडमधल्या टाटा स्टील कंपनीतल्या कारखान्यात हजारो लोक जोखमीवर नोकरी करत आहेत. कंपनीच्या मते उत्पादनाच्या किमतीमुळे कंपनी मोठ्या प्रमाणात तोटा सहन करत आहे. चीनशी स्पर्धा असल्यानं मोठ्या प्रमाणात स्टीलचा जागतिक बाजारात पुरवठा करावा लागतो आहे.
टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटांनीही कंपनीत गुंतवणूक कमी आणि माणसे जास्त असल्याचं मान्य केलं आहे. इंग्लंडमध्ये टाटा स्टील कंपनीतल्या कारखान्यातल्या जवळपास 1 हजार लोकांना नोकरी गमवावी लागली आहे. तर तालबोटमधल्या 750 जणांनी नोकरी सोडावी लागली आहे. ऑक्टोबर 2015ला जवळपास 1200 कामगारांना नोकरी गमवावी लागली आहे. त्याचवेळी रेडकारमधला स्टीलचा कारखाना बंद करावा लागला आहे. प्रसिद्ध उद्योगपती संजीव गुप्तांनीही टाटा स्टीलनं यातून बाहेर पडण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे. तर टाटा कंपनीचे बिझनेस सेक्रेटरी साजिद जावेद यांनी टाटा स्टील विकण्याच्या विचारत असल्याचं प्रतिपादन केलं आहे.