भारतीय स्त्रियांमध्ये वाढतेय धूम्रपानाचे प्रमाण
By admin | Published: May 31, 2014 06:10 AM2014-05-31T06:10:54+5:302014-05-31T06:10:54+5:30
भारतीय पुरुषांमध्ये धूम्रपानाचे प्रमाण झपाट्याने कमी होत असतानाच याउलट स्त्रियांमध्ये या प्रमाणात वाढ होत असल्याची चिंताजनक माहिती एका अहवालातून समोर आली आहे.
नवी दिल्ली : भारतीय पुरुषांमध्ये धूम्रपानाचे प्रमाण झपाट्याने कमी होत असतानाच याउलट स्त्रियांमध्ये या प्रमाणात वाढ होत असल्याची चिंताजनक माहिती एका अहवालातून समोर आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय महिलांमध्ये वंधत्व आणि कर्करोग यांचे प्रमाण वाढले आहे. महिलांमध्ये वाढलेली धूम्रपानाची सवय हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. २०१४ च्या सुरुवातीला ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये एक अभ्यास प्रकाशित झाला. द जर्नल आॅफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशन अर्थात जामाने १९८० ते २०१२ या काळात १८७ देशांतील धूम्रपानाच्या फैलावावर प्रकाश टाकला. यानुसार भारतीय पुरुषांमध्ये धूम्रपानाचे प्रमाण झपाट्याने घटल्याचे दिसून आले. १९८० साली हे प्रमाण ३३.८ टक्के होते, ते २०१२ साली २३ टक्क्यांवर आले. याच कालखंडात स्त्रियांमध्ये हे प्रमाण तीन टक्क्यांवरून वाढून ३.२ टक्के झाल्याचे दिसून येते. उपरोक्त कालखंडात भारतीय स्त्रियांमधील धूम्रपानाचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. ५.३ दशलक्षावरून ते १२.२ दशलक्षावर गेले. भारतीय परिस्थितीमध्ये बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक महिला धूम्रपानाकडे वळल्या आहेत, असे मत फुफ्फुसतज्ज्ञ डॉ. नेविन किशोरे यांनी व्यक्त केले. आॅन्कोलॉजिस्ट सपना नानगिया यांनी स्त्रियांमधील वाढत्या धूम्रपानामागे दोन मुख्य कारणे असल्याचे सांगितले. पाश्चात्त्य सिगारेट कंपन्यांकडून धूम्रपान ही समाजाने स्वीकारलेल्या जीवनशैलीचा भाग असल्याचे जाहिरातीच्या माध्यमातून आघात केला जातो. समाजमान्य जीवनशैलीचा भाग असल्यामुळे सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीन व भारत या देशांतील स्त्रियांनी याचा स्वीकार करावा यासाठी या कंपन्या प्रोत्साहन देत असतात. भारत आणि चीन या दोनच देशांतील महिला धूम्रपानाच्या आहारी गेल्यास या कंपन्यांना पाश्चात्त्य देशांवर अवलंबून राहावे लागणार नाही. ग्लोबल अडल्ट तंबाखू सर्व्हेसह अनेक बहुराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय सर्वेक्षणांचा या अभ्यासासाठी आधार घेण्यात आला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क) नानगिया यांनी या समाजमान्य जीवनशैलीचा कल केवळ नागरी भागातच दिसून येत असल्याचे निदर्शनास आणून दिले. कारण ग्रामीण भागातील महिला पूर्वीपासून मोठ्या प्रमाणात तंबाखूचे सेवन करतात, असे त्या म्हणाल्या. या अभ्यासात गेल्या तीन दशकांत धूम्रपानाच्या प्रमाणात तीन टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले. ‘काही वर्षांपासून दिवसातून चार-पाच सिगारेट ओढणार्या व्यक्तीला फुफ्फुस निकामी होण्याचा धोका संभवतो. तंबाखू सेवनाचा स्त्री-पुरुष दोघांनाही तेवढाच धोका असला तरी महिलांना वंधत्वाच्या समस्येचा धोका अधिक आहे. तसेच त्यांना सर्व प्रकारच्या कर्करोगालाही सामोरे जावे लागू शकतो,’ असा इशारा किशोरे यांनी दिला.