लडाखमधून सैन्य मागे घेण्यावर चीनची 'सहमती'; भारताच्या मुत्सद्दीपणाचा दिसू लागला परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 09:40 PM2024-09-26T21:40:26+5:302024-09-26T21:40:36+5:30
भारत आणि चीन यांच्यातील सीमेवरील तणाव कमी होताना दिसत आहे
India China, Ladakh Border: पूर्व लडाखमध्ये चार वर्षांहून अधिक काळ दोन्ही देशांमधील लष्करी संघर्ष सुरू आहे. तो संपवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये डेमचोक आणि डेपसांगमधून सैन्य मागे घेण्याबाबत चर्चा सुरू आहे. अखेर आता भारत आणि चीन यांच्यातील सीमेवरील तणाव कमी होताना दिसत आहे. पूर्व लडाखमधील संघर्ष संपवण्यासाठी मतभेद कमी करणे आणि संघर्षग्रस्त भागातून सैन्य मागे घेण्यावर दोन्ही देशांमध्ये काही एकमत झाले असल्याची माहिती आहे. भारत आणि चीनने दोन्ही पक्षांना स्वीकारार्ह तोडगा काढण्यासाठी या प्रकरणी चर्चा सुरू ठेवण्याचे मान्य केले आहे. चीनच्या संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी ही माहिती दिली.
चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते झांग झियाओगांग म्हणाले की, चीन आणि भारताने राजकीय आणि लष्करी माध्यमातून एकमेकांशी संपर्क कायम ठेवला आहे. यामध्ये दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री, चीन आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्यातील सीमा सल्लामसलत यंत्रणेद्वारे झालेल्या चर्चेचा समावेश आहे. झांग पुढे म्हणाले की या चर्चेच्या माध्यमातून चीन आणि भारत या दोघांनी एकमेकांच्या चिंता दूर करण्यासाठी त्यांच्यातील मतभेद कमी करण्यास आणि संवाद मजबूत करण्यास सहमती दर्शविली. तसेच दोन्ही देशांमध्ये इतर काही मुद्द्यांवरही सहमती झाली. दोन्ही बाजूंनी शक्य तितक्या लवकर तोडगा काढण्याचे मान्य केले असून ही बाब दोन्ही पक्षांना मान्य आहे.उभय देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये झालेल्या बैठकीचा उल्लेख
चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते झांग यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यातील बैठक तसेच रशियातील ब्रिक्स बैठकीच्या वेळी वांग आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यात झालेल्या नुकत्याच झालेल्या बैठकीचा संदर्भही दिला. डेपसांग आणि डेमचोकसह उर्वरित भागातून सैन्य मागे घेण्याच्या प्रगतीवर त्यांनी भाष्य केले नाही, परंतु दोन्ही बाजूंनी निष्कर्षापर्यंत मजबूत करणे सुरू असल्याचे सांगितले. सीमेवर शांतता राखण्यासाठी आम्ही द्विपक्षीय करार आणि परस्पर विश्वास निर्माण करण्याच्या उपायांचाही पर्याय पडताळून पाहू, असे ते म्हणाले.