भारताने टिकटॉकसह ५९ अॅपवर केलेल्या कारवाईवर चीन सरकारने दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 02:07 PM2020-06-30T14:07:21+5:302020-06-30T14:10:36+5:30
भारत सरकारने चिनी मोबाईल अॅप कंपन्यांवर केलेल्या कारवाईबाबत प्रथमच चीन सरकारकडून प्रतिक्रिया आली आहे.
बीजिंग - चिनी सैन्याने लडाखमधील सीमेवर वाढवलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने सोमवारी टिकटॉक, हॅलो यासारख्या भारतात प्रसिद्ध असलेल्या अॅपसह सुमारे ५९ चिनी अॅपवर बंदीची कारवाई करून चिनच्या मोबाईल अॅप क्षेत्राला हादरा दिला होता. दरम्यान, टिकटॉकसारख्या अॅपचे भारतात मोठे मार्केट असल्याने त्याचा फटका या कंपनीला बसणार असल्याचे संकेत तज्ज्ञांकडून देण्यात येत आहेत. आता भारत सरकारने चिनी मोबाईल अॅप कंपन्यांवर केलेल्या कारवाईबाबत प्रथमच चीन सरकारकडून प्रतिक्रिया आली आहे.
भारत सरकारने केलेल्या या कारवाईबाबत चीनच्या पररष्ट्र मंत्रालयचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी सांगितले की, भारत सरकारने केलेल्या कारवाईमुळे चीन खूप चिंतीत आहे. आम्ही या परिस्थितीला दुजोरा देत आहोत. या संदर्भातील माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट करून दिली आहे.
China is strongly concerned, verifying the situation: Chinese Foreign Ministry spokesperson Zhao Lijian on India banning Chinese apps (file pic) pic.twitter.com/XUbeZpSl6i
— ANI (@ANI) June 30, 2020
चिनी व्यावसायिकांनी आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक कायद्यांचे, नियमांचे पालन करावे, असा चीन सरकारचा आग्रह असतो. आता चिनी गुंतवणूकदारांसह आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचे कायदेशीर हक्क कायम ठेवण्याची जबाबदारी भारतीय सरकारची आहे, असे चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
We want to stress that Chinese Govt always asks Chinese businesses to abide by international & local laws-regulations. Indian Govt has a responsibility to uphold the legal rights of international investors including Chinese ones: Zhao Lijian, Chinese Foreign Ministry spokesperson https://t.co/2Q668cSstApic.twitter.com/MfcKm7ZiLV
— ANI (@ANI) June 30, 2020
दोन्ही देशांमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवारी टिकटॉक, हॅलो, कॅमस्कॅनरसह ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. तसेच सोमवारी कारवाई केलेल्या ५९ अॅपमधून भारतातील माहिती अन्य देशांमध्ये पोहोचवण्यात येत होती, असा ठपका केंद्र सरकारने ठेवला आहे. तसेच ही बाब देशासाठी योग्य नसल्याचे सरकारने म्हटले आहे. दरम्यान, यापुढेही कुठले अॅप देशहिताच्या विरोधात काम करत असल्याचे दिसून आल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे सरकारने सांगितले आहे.
दरम्यान, भारत सरकारने केलेल्या कारवाईनंतर आता टिकटॉकने आपली बाजू मांडली आहे. टिकटॉकने निवेदन जारी केलं असून आम्ही चिनी सरकारला भारतीयांची माहिती दिलेली नाही असं यामध्ये म्हटलं आहे. टिकटॉकच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. टिकटॉक इंडियाचे प्रमुख निखिल गांधी यांनी भारत सरकारने 59 अॅप्स ब्लॉक करण्यासंदर्भात आदेश जारी केला असून यामध्ये टिकटॉकचाही समावेश असल्याचं म्हटलं आहे. तसेच आम्ही या आदेशाचे पालन करत आहोत. आम्हाला याबाबत सरकारच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठकीचे निमंत्रण आले असून या बैठकीत आम्हाला आमची बाजू मांडण्याची व स्पष्टीकरण देण्याची संधी मिळणार असल्याचं सांगितलं.