वजन वाढण्याचे असेही कारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2017 01:19 AM2017-05-10T01:19:46+5:302017-05-10T01:19:46+5:30
वजन वाढण्याची कारणे सर्वांनाच ठाऊक आहेत; परंतु कधीकधी अशी कारणे समोर येतात की अचंबा वाटतो. लिजी डेनिसन या तरुणीबाबत असेच घडले.
लंडन : वजन वाढण्याची कारणे सर्वांनाच ठाऊक आहेत; परंतु कधीकधी अशी कारणे समोर येतात की अचंबा वाटतो. लिजी डेनिसन या तरुणीबाबत असेच घडले. तिचे वजन दोन वर्षांपासून सतत वाढत होते. सर्व उपाय करून थकलेल्या लिजीने एक दिवस एमआरआय टेस्ट केली. या टेस्टचे निष्कर्ष कळल्यानंतर तिच्या पायाखालची वाळू घसरली. लिजीला ब्रेन ट्यूमर होता आणि त्यामुळे लठ्ठ होत चालली होती, असे टेस्टमध्ये आढळून आले. २०१३ मध्ये लिजीचे वजन वाढण्यास सुरुवात झाली. तिचे वजन ५४ किलो होते. दोन वर्षांनंतर ते वाढून १०२ किलो झाले. वजनात अर्ध्या क्विंटलची वाढ झाली. सामान्यपणे वजन वाढत आहे, असे तिला आणि तिच्या कुटुंबियांना प्रारंभी वाटले. ‘मी जास्त जेवत नव्हते. तरीही माझे वजन वाढतच चालले होते. त्यामुळे आईही काळजीत पडली होती, असे तिने सांगितले. शेवटी लिजीने रुग्णालयाचा रस्ता धरला. तपासणीनंतर डॉक्टरांनीही आहाराकडे बोट दाखविले. अधिक उष्मांकाच्या आहारामुळे वजन वाढत असल्याचे मत व्यक्त करून त्यांनी हलका आहार घेण्याचा सल्ला लिजीला दिला. त्यानंतर लिजीने आहारातील उष्मांकाचे प्रमाण कमी केले; मात्र वजन कमी होण्याऐवजी वाढतच गेले. मग मात्र लिजीला भीती वाटू लागली. तिने एमआरआय टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. या टेस्टचे निष्कर्ष समोर आल्यानंतर लिजीच्या पायाखालची वाळू घसरली. डॉक्टरांनी तिला ब्रेन ट्यूमर असल्याचे सांगितले. हा ट्यूमर सातत्याने वाढत चालला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. वस्तुस्थिती कळल्यानंतर लिजीने हार्मोन थेरपी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर केवळ पाचच आठवड्यांत तिचे वजन १० किलोने कमी झाले. लिजीवर शस्त्रक्रिया करून हा ट्यूमर काढून टाकण्यात आला.