हाँगकाँगमध्ये निदर्शकांची विधिमंडळात तोडफोड; कामकाज बंद पाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 05:47 AM2019-07-02T05:47:24+5:302019-07-02T05:48:14+5:30
विधिमंडळात घुसलेल्या निदर्शकांनी अनेक चित्रांच्या तसबीरींची मोडतोड केली आणि भिंतींवर स्वातंत्र्याच्या घोषणा रंगविल्या.
हाँगकाँग: हाँगकाँगमधील शेकडो निदर्शकांनी गुन्हेगार प्रत्यार्पणाच्या वादग्रस्त विधेयकाविरुद्धचा संताप व्यक्त करण्यासाठी विधिमंडळात घुसून मोडतोड केली. ब्रिटनने भाडेपट्ट्याने घेतलेले हाँगकाँगपुन्हा चीनच्या स्वाधीन केल्याच्या २५ व्या वर्धापनदिनी घडलेली ही घटना या प्रांतावरील सार्वभौम चिनी सत्तेस स्वातंत्र्यवाद्यांनी दिलेले आजवरचे सर्वात धाडसी आव्हान मानले जात आहे.
विधिमंडळात घुसलेल्या निदर्शकांनी अनेक चित्रांच्या तसबीरींची मोडतोड केली आणि भिंतींवर स्वातंत्र्याच्या घोषणा रंगविल्या. काही निदर्शक सभापतींच्या उच्चासनावर तर काही विधिमंडळ सदस्यांच्या जागांवर जाऊन बसले. परिस्थितीचे गांभीर्य पाहून, वादग्रस्त विधेयकाच्या मंजुरीचेर् कामकाज स्थगित करण्यात आले आहे. ते पुढील वर्षी आपोआप ‘लॅप्स’ होईल, असे सरकारने लगेच जाहीर केले. पण त्याला कोणताही प्रतिसाद न देता निदर्शक इमारतीत ठाण मांडून होते. सुरक्षेच्या कारणावरून मंगळवारी सर्व सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचेही सरकारने जाहीर केले आहे. शस्त्रधारी पोलिसांनी निदर्शकांना शांतपणे निघून न गेल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला. पण त्यांनी प्रत्यक्षात बळाचा वापर केला नाही.