अमेरिकेतील भारतीयांवर संकट, IT क्षेत्रात मंदी; 2 लाख कर्मचाऱ्यांची गेली नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 10:44 PM2023-01-24T22:44:33+5:302023-01-24T22:46:19+5:30
‘द वॉशिंगटन पोस्ट’ च्या वत्तानुसार गतवर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात आयटी सेक्टरमध्ये जवळपास २ लाख कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्यात आलं आहे.
आयटी क्षेत्रातील जगप्रसिद्ध Google, Microsoft आणि Amazon सारख्या कंपन्यांमध्ये नोकरकपात सुरू झाली आहे. या नोकरकपातीचा परिणाम अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांवरही झाल्याचं दिसून येत आहे. अमेरिकेतील या मंदीमुळे तिथे वास्तव्यास असलेल्या हजारो भारतीयांची आईटी क्षेत्रातील नोकरी गेली आहे. आता, नोकरी गेल्यामुळे अमेरिकेत राहणेही कठीण बनले आहे. तर, मंदीमुळे नवीन रोजगार किंवा जॉब मिळवणे अत्यंत कसोटीचे बनले आहे.
‘द वॉशिंगटन पोस्ट’ च्या वत्तानुसार गतवर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात आयटी सेक्टरमध्ये जवळपास २ लाख कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्यात आलं आहे. नोकरीवरुन काढण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये ३० ते ४० टक्के भारतीय नागरिक असल्याची माहिती आहे. त्यापैकी, बहुतांश भारतीय हे एच-1बी आणि एल1 वीजा वर आहेत. व्यावसायिक वीजावर वास्तव्य असल्याने लवकरात लवकर नवी नोकरीच्या शोधात हे भारतीय आहेत.
अमेझॉनमध्ये काम करण्यासाठी गीता या तीन महिन्यांपूर्वीच अमेरिकेत गेल्या होत्या. मात्र, याच आठवड्यात त्यांना सांगण्यात आलं की, २० मार्च रोजी त्यांच्या नोकरी कार्यकाळाचा शेवटचा दिवस आहे. एच-1बी वीजा वर अमेरिकेत आलेल्या आणखी एका आयटी क्षेत्रातील भारतीय नागरिकास मायक्रोसॉफ्ट ने १८ जानेवारी रोजी बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे, सद्यस्थिती तेथील अतिशय खराब असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, एच-1बी वीजा धारकांची स्थिती अतिशय दयनीय झाली असून त्यांना ६० दिवसांत नवीन नोकरी शोधावी लागेल, अन्यथा त्यांना मायदेशी परतण्याशिवाय पर्यायच नाही.