अमेरिकन लोकांनी घरांवर घेतली विक्रमी फेरकर्जे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 05:29 AM2021-03-13T05:29:42+5:302021-03-13T05:29:57+5:30
तज्ज्ञांनी सांगितले की, संकटाच्या काळात घरांच्या किमती कमी होतात. मात्र, कोविड-१९ पीछेहाटीच्या काळात घरांच्या किमती आश्चर्यकारकरीत्या वाढल्या.
वॉशिंगटन : कोविड-१९ साथीमुळे गाजलेल्या २०२० मध्ये अमेरिकेत नागरिकांनी आपल्या घरांवरील कर्जांची पुनर्रचना करून विक्रमी फेरकर्जे काढली असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. आधीच्या कर्जाची पुनर्रचना करून नवीन कर्ज काढण्याच्या प्रक्रियेस अर्थशास्त्रीय भाषेत ‘कॅश-आऊट रिफायन्सिंग असे म्हटले जाते. या प्रक्रियेत तारणावर नवे जास्तीचे कर्ज काढले जाते. त्यातून आधीचे कर्ज भरून उरलेली रक्कम कर्जदारास मिळते. २०२० मध्ये अमेरिकी नागरिकांनी आपल्या घरांवर ‘कॅश-आऊट रिफायनान्सिंग’द्वारे प्रचंड प्रमाणावर फेरकर्जे घेतली आहेत.
तारण कर्ज डेटा संस्था ‘ब्लॅक नाईट आयएनसी’ने जारी केलेल्या एका अहवालात म्हटले आहे की, गेल्या वर्षी अमेरिकेतील घरमालकांनी ‘होम इक्विटी’च्या (कर्ज आणि घराच्या किमतीत फरक) माध्यमातून १५२.७ अब्ज डॉलर ‘कॅश-आऊट’ केले आहेत. २०१९ च्या तुलनेत हा आकडा तब्बल ४२ टक्के अधिक आहे, तसेच २००७ च्या नंतरच्या काळातील हे घरांवरील सर्वाधिक ‘कॅश-आऊट’ ठरले आहे. तारण संस्थांनी २०२० मध्ये एकूण २.८ लाख कोटींचे रिफायनान्स केले आहे.
तज्ज्ञांनी सांगितले की, संकटाच्या काळात घरांच्या किमती कमी होतात. मात्र, कोविड-१९ पीछेहाटीच्या काळात घरांच्या किमती आश्चर्यकारकरीत्या वाढल्या. त्यामुळे लोकांना रोखीकरणासाठी अधिक ‘होम इक्विटी’ उपलब्ध झाली. पेनसिल्व्हानिया विद्यापीठाच्या अर्थतज्ज्ञ आणि प्राध्यापक सुसान वॉचर यांनी सांगितले की, संकटाच्या काळात फेरकर्जे हा अनेकांसाठी आधाराचा मोठा स्रोत ठरला आहे.
अमेरिकेतील घरांच्या किमतीत डिसेंबरमध्ये सरासरी ३,१०,००० डॉलरची वाढ झाली. डिसेंबर २०१९ च्या तुलनेत ही वाढ १३ टक्के आहे. मोठ्या शहरांपासून ग्रामीण भागांपर्यंत सर्वत्र ही वाढ दिसून आली आहे. पैशांची गरज लक्षात घेऊन नागरिकांनी त्यांच्या घरांचे फेरमूल्यांकन करून घेतले.