शरण देणा-या जर्मनीलाच निर्वासितांनी कोर्टात खेचले
By Admin | Published: October 15, 2015 03:48 PM2015-10-15T15:48:26+5:302015-10-15T15:48:26+5:30
निर्वासितांना शरण देणा-या जर्मनीलाच सीरियातून आलेल्या २० निर्वासितांनी कोर्टात खेचले असून आम्हाला राहण्यासाठी जागा उपलब्ध करुन द्या अशी त्यांची मागणी आहे.
ऑनलाइन लोकमत
बर्लिन, दि. १५ - निर्वासितांना शरण देणा-या जर्मनीलाच सीरियातून आलेल्या २० निर्वासितांनी कोर्टात खेचले आहे. जर्मनीतील निर्वासितांच्या शिबीरात एक आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी होऊनही जर्मनीकडून निवासाची व अन्य सुविधा मिळत नसल्याचे सांगत त्यांनी चक्क कोर्टात धाव घेतली आहे.
इराक, सीरिया, लिबीया यासारख्या अशांत देशांमधील लाखो नागरिक सध्या युरोपमध्ये निर्वासित म्हणून जात आहेत. निर्वासितांचा कल जर्मनीकडे जास्त असून जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांनी निर्वासितांना नागरिकत्व व अन्य सुविधा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता हेच आश्वासन त्यांना डोकेदुखी वाढवणारे ठरले आहे. संडे एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार दररोज हजारो निर्वासित शहरातील निर्वासितांच्या मुख शिबीराजवळ येऊन नाव नोंदवण्यासाठी रांगेत उभे असतात. यातील अनेकजण आठवड्याभरापासून रांगेत उभे असल्याचा दावाही करत असतात. निर्वासितांची कागदपत्र तपासल्यावरच त्यांना शिबीरात राहण्याचे जागा व अन्य सुविधा मिळतात. आता जर्मनीत आलेल्या २० सीरियन निर्वासितांनी जर्मनीलाच कोर्टात खेचले आहे. आम्हाला आठवडाभराचा कालावधी झाला तरी घर मिळत नाही अशी त्यांची तक्रार आहे. सरकारने आम्हाला तातडीने सुविधा उपलब्ध करुन द्यावात असे या निर्वासितांचे म्हणणे आहे.