हिजाबवरुन सुरू असलेल्या वादात मलालाची उडी; भारतीय नेत्यांना केलं आवाहन, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 12:06 PM2022-02-09T12:06:14+5:302022-02-09T12:38:23+5:30
Malala Yousafzai And Hijabs : नोबेल शांतता पारितोषिक विजेती आणि महिला हक्क कार्यकर्ती मलाला युसूफजई हिनेही हिजाबवरून कर्नाटकात सुरू असलेल्या वादात उडी घेतली आहे.
नवी दिल्ली - कर्नाटकमध्ये हिजाब विरुद्ध भगवा वाद चिघळला आहे. ही परिस्थिती पाहता, राज्यातील सर्व शिक्षणसंस्था 3 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हिजाब बंदीवरून कर्नाटकमध्ये विविध ठिकाणी काही गटांमध्ये वादावादी झाली. हिजाब बंदीचे प्रकरण न्यायलयात गेले असून, याप्रकरणी न्यायालयाने बुधवारपर्यंत सुनावणी तहकूब केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक तसेच सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. याच दरम्यान नोबेल शांतता पारितोषिक विजेती आणि महिला हक्क कार्यकर्ती मलाला युसूफजई हिनेही हिजाबवरून कर्नाटकात सुरू असलेल्या वादात उडी घेतली आहे.
मलालाने (Malala Yousafzai) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट करून या सर्व प्रकरणावर भाष्य केलं आहे. "कॉलेज आम्हाला अभ्यास आणि हिजाब यापैकी एक निवडण्यास भाग पाडत आहे. मुलींना त्यांच्या हिजाबमध्ये शाळेत प्रवेश नाकारला जाणे हे भयावह आहे. कमी किंवा जास्त कपडे घातल्याने महिलांच्या वस्तुनिष्ठतेवर आक्षेप घेतला जात आहे. भारतीय नेत्यांनी मुस्लिम महिलांना कमी लेखणं थांबवावं" असं मलालाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
“College is forcing us to choose between studies and the hijab”.
— Malala (@Malala) February 8, 2022
Refusing to let girls go to school in their hijabs is horrifying. Objectification of women persists — for wearing less or more. Indian leaders must stop the marginalisation of Muslim women. https://t.co/UGfuLWAR8I
शिमोगातील एका महाविद्यालयात एक विद्यार्थी राष्ट्रध्वजाच्या जागेवर भगवा ध्वज फडकावितानाचा व्हिडिओ समोर आला आहे. इथे दगडफेकीनंतर जमावबंदी लागू केली आहे, तर उडुपि येथे हिजाब घातलेल्या मुलींनी महाविद्यालयात प्रवेश केला. त्याचवेळी भगव्या रंगाचा स्कार्फ गुंडाळलेली काही मुले आणि मुली तेथे दाखल झाले. दोन्ही गटांमध्ये वादावादी झाली. बागलकोटमध्येही दगडफेक झाली. त्यानंतर पोलिसांना लाठीमार करावा लागला. हा वाद वाढत असल्याचे पाहून राज्य सरकारने तीन दिवस सर्व शिक्षण संस्था बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला.
काय आहे वाद?
- उडुपीमधील काही विद्यार्थिनींना हिजाब परिधान केल्यामुळे वर्गात प्रवेश नाकारण्यात आला होता.
- त्याविरोधात त्या मुलींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. हिजाब घालू न देणे हे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.