चीन-तिबेट यांचे संबंध युरोपीय समुदायाप्रमाणे हवेत : दलाई लामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 02:02 AM2018-03-17T02:02:43+5:302018-03-17T02:02:43+5:30
युरोपीय समुदायातील देश ज्याप्रमाणे एकमेकांशी संलग्न आहेत, त्याप्रमाणे तिबेटही चीनसोबत राहू शकतो, असे तिबेटींचे धर्मगुरू दलाई लामा यांनी म्हटले आहे.
बीजिंग : युरोपीय समुदायातील देश ज्याप्रमाणे एकमेकांशी संलग्न आहेत, त्याप्रमाणे तिबेटही चीनसोबत राहू शकतो, असे तिबेटींचे धर्मगुरू दलाई लामा यांनी म्हटले आहे.
तिबेटी नागरिकांच्या हक्कांसाठी लढणारा इंटरनॅशनल कॅम्पेन फॉर तिबेट हा आंतरराष्ट्रीय तिबेटींचा गट अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे सक्रिय आहे. या गटाच्या स्थापनेला ३० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दलाई लामा त्यांना पाठविलेल्या संदेशात हे म्हटले आहे. त्यात दलाई लामा यांनी म्हटले आहे की, तिबेटला स्वातंत्र्य नको, तर स्वायत्तता हवी आहे. तिबेटमध्ये १९५९ साली चीनविरोधात बंड पुकारण्यात आले. त्या वेळी चिनी लष्कराच्या कारवाईनंतर दलाई लामांनी भारतात आश्रय घेतला. हिमाचल प्रदेश येथील धरमशाला येथे ते राहतात.
ते पुढे म्हणाले की, युरोपीय समुदायाने एकत्र राहाण्याची जी सामुहिक इच्छाशक्ती दाखविली ती मला भावते. तिबेटची चीनबरोबरच राहण्याची इच्छा आहे. चीन स्वत:ला संघराज्य म्हणवते. त्यामुळे तिबेटला चीनच्या संघराज्याचा भाग बनून राहण्यात काहीच अडचण नाही. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग तिबेटी लोकांना नक्की न्याय देतील.
आम्ही केला विकास : चीन
तिबेटला स्वातंत्र्य वा स्वायत्तता देण्यास चीनचा विरोध असून तो आमचा अविभाज्य भाग असल्याची त्या देशाची भूमिका आहे. या भागाचा उत्तम विकास केल्याचा दावा करून चीनने म्हटले आहे की, तिबेटी नागरिकांच्या हक्कांचा आम्ही आदर करतो. शिवाय, दलाई लामा यांना भेटण्यास कोणतेही राष्टÑप्रमुख तयार नाहीत. (वृत्तसंस्था)