पाच तालिबान नेत्यांच्या बदल्यात अमेरिकी सैनिकाची सुटका
By admin | Published: June 2, 2014 06:08 AM2014-06-02T06:08:35+5:302014-06-02T06:08:35+5:30
गेल्या पाच वर्षांपासून तालिबानच्या कैदेत असणार्या आपल्या एका सैनिकाची मुक्तता करण्यासाठी अमेरिकेने पाच तालिबान कैद्यांची सुटका केली
वॉशिंग्टन : गेल्या पाच वर्षांपासून तालिबानच्या कैदेत असणार्या आपल्या एका सैनिकाची मुक्तता करण्यासाठी अमेरिकेने पाच तालिबान कैद्यांची सुटका केली. अमेरिकेच्या अफगाण लढाईतील हा अखेरचा युद्धकैदी ठरला. अमेरिका व तालिबानमध्ये यशस्वी वाटाघाटी घडवून आणण्यासाठी कतारने मध्यस्थी केली. तालिबान दहशतवाद्यांनी सार्जंट बोवे बेर्गडाहल याला गेल्या पाच वर्षांपासून ओलीस ठेवले होते. त्याच्या सुटकेसाठी गेली काही वर्षे वाटाघाटी सुरू होत्या. अध्यक्ष बराक ओबामा यांनी बोवेचे आई-वडील बॉब आणि जेनी यांना दूरध्वनी करून बोवेच्या सुटकेची सुवार्ता कळविली. बोवे याला जर्मनीतील अमेरिकी लष्करी रुग्णालयाकडे नेण्यात येत आहे. जर्मनीतील उपचारानंतर त्याला टेक्सासमधील सॅन अॅन्टोनिओ येथील लष्करी वैद्यकीय केंद्रात हलविले जाईल, असे लष्करी सूत्रांनी सांगितले. जर्मनीकडे रवाना होण्यापूर्वी बोवेवर अफगाणिस्तानातील बगराम हवाई तळावर उपचार करण्यात आले. ‘अमेरिकी लष्करी दलाने तालिबानच्या १८ सदस्यांकडून बोवेचा ताबा घेतला. पूर्व अफगाणिस्तानातील अज्ञात ठिकाणी शनिवारी सायंकाळी सहा वाजता हस्तांतरण प्रक्रिया झाली. हे हस्तांतरण शांततामय व झटपट झाले. अमेरिकी पथक हेलिकॉप्टरने गेले होते आणि थोडा वेळच तेथे थांबले. बोवे चालू शकत होता व हेलिकॉप्टरमध्ये बसल्यानंतर तो भावुक झाला होता,’ असे एका अधिकार्याने सांगितले. हेलिकॉप्टरमध्ये बोवेने पेपरप्लेटवर ‘एसएफ’(स्पेशल फोर्स) असे लिहिले. त्यावर एका अधिकार्याने जोराने होय आम्ही दीर्घकाळापासून तुझा शोध घेत होतो, असे उत्तर दिले आणि याचवेळी बोवेच्या नेत्रातून अश्रू ओघळू लागले, असे सूत्रांनी सांगितले. तालिबानने त्याला अफगाणिस्तानच्या पूर्व भागात ३० जून २००९ रोजी पकडले होते. (वृत्तसंस्था) पाच तालिबान कैद्यांची सुटका बोवेच्या मोबदल्यात अमेरिकेने पाच तालिबान कैद्यांची सुटका केली. हे कैदी ग्वांतानामो कारागृहामध्ये कैद होते. ते आता औपचारिकरीत्या कतारच्या ताब्यात असून, अमेरिकी लष्कराचे सी-१७ हे विमान त्यांना घेऊन कतारकडे रवाना झाले आहे. सुटका करण्यात आलेल्या कैद्यांमध्ये मोहंमद फजल, मुल्ला नुरुल्लाब नुरी, मोहंमद नबी, खैरुल्लाह खैरख्वाह आणि अब्दुल हक वसीक यांचा समावेश असल्याचे एका अधिकार्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. आपल्या सैनिकाची सुटका होणार असली तरी काँग्रेसचे काही सदस्य तालिबान कैद्यांच्या सुटकेबाबत विशेष करून फजल याच्या सुटकेबाबत चिंतित होते. फजलची क्रूरकर्मा अशी ओळख आहे. १९९८ ते २००१ दरम्यान त्याने अफगाणिस्तानातील अल्पसंख्याक शिया नागरिकांची मोठ्या प्रमाणात हत्या घडवून आणल्याचा आरोप आहे. या पाचही जणांपासून अमेरिकेला धोका संभवत असल्याने २००२ मध्ये त्यांना ग्वांतोनामो कारागृहात हलविण्यात आले होते. बोवे याच्या सुटकेचे स्वागत करताना काँग्रेस सदस्य माईक रोजर्स म्हणाले की, बोवेच्या सुटकेचा आनंद असला तरी अमेरिकेने तालिबानशी वाटाघाटी करून त्याच्या मोबदल्यात पाच खतरनाक तालिबान नेत्यांची सुटका करण्याचे मान्य केल्याने मी थक्क झालो आहे. हजारो अमेरिकी नागरिकांचे बळी घेणार्यांची सुटका करण्यास आपण कसे काय राजी होऊ शकतो, असा सवालही त्यांनी केला.