व्यापार युद्धात तूर्त भारताला दिलासा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या आदेशात काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 10:24 IST2025-02-04T10:23:08+5:302025-02-04T10:24:37+5:30
Donald Trump Tariff Threat: भारताबरोबर असलेली अमेरिकेची व्यापारी तूट या तीन देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे. भारताबरोबरची व्यापारी तूट केवळ ३.२ टक्के आहे.

व्यापार युद्धात तूर्त भारताला दिलासा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या आदेशात काय?
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवर २५ टक्के आणि चीनवर १० टक्के टॅरिफ (आयात कर) लादण्याची घोषणा केल्यानंतर नवीन व्यापार युद्ध सुरू झाले आहे. टॅरिफ लादण्याच्या पहिल्या कार्यकारी आदेशात ट्रम्प यांनी भारताचा उल्लेख केलेला नाही.
भारताबरोबर असलेली अमेरिकेची व्यापारी तूट या तीन देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे. भारताबरोबरची व्यापारी तूट केवळ ३.२ टक्के आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याच महिन्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार असून, यावेळी व्यापारी संबंधांवर वाटाघाटी होण्याची शक्यता आहे.
चिनी वस्तूंवर सध्या लावण्यात आलेल्या १० टक्के टॅरिफमुळे अधिक भारतीय वस्तूंना अमेरिकन बाजारपेठेत प्रवेश करण्याची संधी मिळेल, असे बाजारज्ज्ञांना वाटते.
भारताचे टॅरिफपासून बचावाचे प्रयत्न
अमेरिकेच्या टॅरिफपासून वाचण्यासाठी भारताने अमेरिकन निर्यातीला फायदा व्हावा यासाठी कर कमी करण्यास सुरुवात केली आहे.
शनिवारी (1 फेब्रुवारी) सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात अमेरिकेने निर्यात केलेल्या वस्तूंवरील शुल्क कमी करण्यात आले. यात १,६०० सीसीपेक्षा कमी इंजिन क्षमता असलेल्या मोटारसायकली, सिंथेटिक फ्लेवरिंग एसेन्स आदींचा समावेश आहे.
व्यापार युद्धामुळे भारताचा तोटा होईल का?
अमेरिकेच्या बाजारपेठेत महागाई वाढवणारे व्यापार युद्ध भारतासाठी नुकसानकारक ठरू शकते. कारण अमेरिका हा भारताचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार आणि सर्वांत मोठे एक्स्पोर्ट मार्केट आहे.
२०२३ मध्ये भारताने अमेरिकेला निर्यात केलेल्या वस्तूंमध्ये औषध उत्पादनांचा वाटा सर्वांत मोठा होता. मौल्यवान धातू व मत्स्य उत्पादन दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.