धार्मिक स्वातंत्र्य आयोगास सरकारने व्हिसा नाकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2016 02:52 AM2016-03-05T02:52:41+5:302016-03-05T02:52:41+5:30
भारतातील धार्मिक स्वातंत्र्याच्या स्थितीवर चर्चा करून त्याबाबत अहवाल तयार करण्यासाठी भारत दौऱ्यावर येणाऱ्या अमेरिकन आयोगाला भारत सरकारने व्हिसा नाकारला आहे.
वॉशिंग्टन : भारतातील धार्मिक स्वातंत्र्याच्या स्थितीवर चर्चा करून त्याबाबत अहवाल तयार करण्यासाठी भारत दौऱ्यावर येणाऱ्या अमेरिकन आयोगाला भारत सरकारने व्हिसा नाकारला आहे.
अमेरिकन आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाचे (यूएससीआयआरएफ) तीन सदस्यीय शिष्टमंडळ भारतातील शासकीय अधिकारी, धार्मिक नेते व कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी भारत दौऱ्यावर जाऊ इच्छित होते. एक आठवड्याचा हा प्रस्तावित दौरा शुक्रवारपासून सुरू होणार होता; मात्र तो आता रद्द झाला आहे.
भारत सरकारने व्हिसा नाकारल्यामुळे आम्ही अत्यंत निराश झालो आहोत, असे यूएससीआयआरएफचे अध्यक्ष रॉबर्ट पी. जॉर्ज यांनी एका निवेदनात म्हटले आहे. ते म्हणाले की, ‘भारत हा वैविध्याने नटलेला धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही देश आहे. अमेरिकेचा निकटचा सहकारी असल्यामुळे त्याने आम्हाला दौऱ्याची अनुमती द्यायला हवी होती.
यूएससीआयआरएफच्या सदस्यांना भारताकडून व्हिसा न दिला जाण्याची ही पहिली वेळ नाही. जगभरातील देशांत धार्मिक स्वातंत्र्यावर वार्षिक अहवाल तयार करणाऱ्या सदस्यांना यापूर्वीच्या संपुआ सरकारच्या काळातही व्हिसा नाकारण्यात आला होता.(वृत्तसंस्था)
जॉर्ज म्हणाले की, यूएससीआयआरएफने अनेक देशांचा दौरा केला असून, त्यात धार्मिक स्वातंत्र्याचे सर्वाधिक उल्लंघन होत असलेल्या पाकिस्तान, सौदी अरेबिया, व्हिएतनाम, चीन आणि म्यानमारसारख्या देशांचाही समावेश आहे. भारत सरकार या देशांच्या तुलनेत अधिक पारदर्शकता उपलब्ध करून देईल व आपले विचार थेट यूएससीआयआरएफपर्यंत पोहोचविण्याच्या संधीचे स्वागत करील, अशी आशा आहे.
‘यूएससीआयआरएफ’चे शिष्टमंडळ शुक्रवारी रवाना होणार होते आणि या दौऱ्यासाठी परराष्ट्र मंत्रालय, नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासाचा पाठिंबा होता.
यूएससीआयआरएफच्या मुख्य जबाबदाऱ्यांत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय पातळीवर धार्मिक स्वातंत्र्याच्या परिस्थितीचा आढावा घेणे आणि त्याबाबत राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्रमंत्री आणि काँग्रेसला धोरणात्मक शिफारशी करणे याचा समावेश आहे.
२०१४ नंतर भारतात धार्मिक स्वातंत्र्याची स्थिती खराब झाल्याची वृत्ते धार्मिक संघटना, मानवाधिकार संघटना आणि स्वयंसेवी संघटनांकडून येत आहेत. या पार्श्वभूमीवर यूएससीआयआरएफ भारताला भेट देण्याचे प्रयत्न सुरूच ठेवणार आहे, असे जॉर्ज म्हणाले. यूएससीआयआरएफ अमेरिकन केंद्रीय सरकारचा एक स्वतंत्र, द्विपक्षीय आयोग असून या आयोगाच्या आयुक्तांची नियुक्ती राष्ट्राध्यक्ष आणि काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांचे नेते करतात.