अर्जेंटिनात सापडले सर्वांत मोठ्या डायनोसॉरचे अवशेष
By admin | Published: May 19, 2014 03:50 AM2014-05-19T03:50:03+5:302014-05-19T03:50:03+5:30
येथील जीवाश्मतज्ज्ञांना पृथ्वीवरील सर्वांत मोठ्या डायनोसॉरचे अवशेष सापडले आहेत.
ब्यूनोस आयर्स : येथील जीवाश्मतज्ज्ञांना पृथ्वीवरील सर्वांत मोठ्या डायनोसॉरचे अवशेष सापडले आहेत. १३० फूट लांब, तर ६५ फूट उंचीच्या या डायनोसॉरचे वजन १४ आफ्रिकन हत्तींच्या वजनाएवढे आहे, असा निष्कर्ष जीवाश्म तज्ज्ञांनी काढला आहे. उल्लेखनीय म्हणजे यापूर्वी सापडलेल्या अर्जेंटिनासॉरपेक्षा याचे वजन सातपट अधिक आहे. सुमारे ९५ दशलक्ष वर्षांपूर्वीच्या या डायनोसॉरचे हे अवशेष अर्जेंटिनातील पॅटागोनियाच्या पश्चिमेकडील वाळवंटी भाग म्हणून ओळखल्या जाणार्या त्रिलीव्ह या गावात सापडले. येथील स्थानिक शेतमजुराला २०११ मध्ये अपघाताने डायनोसॉरच्या अस्थी आढळल्या. त्रिलीव्ह गाव हे अर्जेंटिनाच्या दुर्गम भागात येते. ब्यूनोस आयर्सपासून १,३०० किलोमीटर अंतरावर दक्षिणेकडे हे गाव आहे. यानंतर येथे इग्डियो फेरुगलिओ या अर्जेंटिनाच्या जीवाश्म वस्तुसंग्रहालयाच्या वतीने खोदकाम हाती घेण्यात आले. डॉ. लुईस कार्बालिडो आणि डॉ. डिएगो पोल यांनी याच्या नेतृत्वाखाली हे काम पार पडले. शाकाहारी गटात मोडणार्या ७७ टन वजनाच्या या डायनोसॉरची मान २० मीटर म्हणजेच सात मजल्याच्या इमारतीएवढी उंच आहे. त्याच्या मांडीचे हाड पुरुषभर उंचीचे आहे. साडेनऊ ते दहा कोटी वर्षांपूर्वी या कालावधीत महाकाय डायनोसॉर अस्तित्वात होते. या डायनोसॉरच्या आतापर्यंत सुमारे २०० अस्थी आढळल्या असून त्या सर्व सुस्थितीत आहेत. अवशेष सापडलेल्या या डायनोसॉरचे अद्याप नामकरण करण्यात आले नाही, अशी माहिती अर्जेंटिनातील त्रिलीव्ह येथील प्राणिसंग्रहालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)