धक्कादायक! "कोरोनाचे पुढील केंद्र होऊ शकते आफ्रिका, तीन लाखहून अधिक लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 08:43 PM2020-04-17T20:43:37+5:302020-04-17T22:27:40+5:30
आफ्रिका कोरोना व्हायरसचे पुढील केंद्र होऊ शकते, असा इशारा जागतीक आरोग्य संघटनेनेही (डब्ल्यूएचओ) दिला आहे. गेल्या आठवड्यात येथे कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढली आहे. आतापर्यंत तेथे 1,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
जोहान्सबर्ग : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात हाहाकार घातला आहे. आतापर्यंत कोरोनाने एक लाखहून अधिक जणांचा बळी घेतला आहे. अशातच, संयुक्त राष्ट्र आर्थिक आयोगाच्या एका अहवालात, आफ्रिकेत कोरोना व्हायरसमुळे तब्बल 3 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो, अशी धक्कादायक शक्यता वर्तवण्यात आली आहे. ही शक्यता वर्तवताना, परिस्थिती सर्वसाधारण राहिल्यास तीन लाख लोकांचा अन्यथा परिस्थिती बिघडली आणि व्हायरसला रोखण्यात हस्तक्षेप केला गेला नाही, तर तब्बल 33 लाख लोकांचा येथे मृत्यू होऊ शकतो. तसेच 120 कोटी लोकांना कोरोनाची लागण होऊ शकते, असे या अहवालात म्हणण्यात आले आहे.
आफ्रिका कोरोना व्हायरसचे पुढील केंद्र होऊ शकते, असा इशारा जागतीक आरोग्य संघटनेनेही (डब्ल्यूएचओ) दिला आहे. गेल्या आठवड्यात येथे कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढली आहे. आतापर्यंत तेथे 1,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तर 18 हजारहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसे पाहिल्यास हा आकडा अमेरिका आणि यूरोपच्या तुलनेत फार कमी आहे. मात्र, डब्ल्यूएचओचे आफ्रिका विभागाचे संचालक मत्सिदिसो मोइती यांच्यामते, कोरोना व्हायरस दक्षिण आफ्रिका, नायजेरिया, आइवरी कोस्ट, कॅमरून आणि घाना येथे राजधानी शहरांपासून दूर असलेल्या भागांतही वेगने पसरत आहे.
जगात सर्वाधिक वाईट स्थिती अमेरिकेची -
अमेरिकेत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा सातत्याने वाढताना दिसत आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत अमेरिकेत विक्रमी मृत्यू झाले आहेत. येथे 24 तासांत कोरोनामुळे तब्बल 4,491 जणांचा मृत्यू झाला आसून मृतांचा आकडा गुरुवारी 32,917 वर पोहोचला. जगात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. मात्र, अमेरिकेत गुरुवारी 2257 जणांचाच कोरोनामुळे मृत्यू झाला, असे सीएनएनने म्हटले आहे.
सीएनएनने जाहीर केलेले आकडे हे रुग्णालयात झालेल्या मृत्यूंचे आहेत. तर एएफपी या वृत्त संस्थेने मृतांच्या आकड्यांमध्ये अशांचाही समावेश केला आहे, ज्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे, या दोघांच्या आकड्यांमध्ये तफावत दिसून येत आहे. अमेरिकेत आतापर्यंत एकूण 6,67,800 हून अधिक जणांचा कोरोनाची लागण झाली आहे.