रिपब्लिकन पार्टीकडून ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर
By admin | Published: July 20, 2016 07:08 AM2016-07-20T07:08:11+5:302016-07-20T07:25:50+5:30
रिपब्लिकन नेते डोनाल्ड ट्रम्प यांना पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
ऑनलाइन लोकमत
अमेरिका, दि. 20 - रिपब्लिकन नेते डोनाल्ड ट्रम्प यांना पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ट्रम्प यांना उमेदवारी जाहीर केल्यानं त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. ट्रम्प यांनी 1237 मताधिक्य मिळवून रिपब्लिकन पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी मिळवली आहे. शेवटच्या मिनिटापर्यंत बंडखोरांमुळे ट्रम्प यांना उमेदवारी मिळण्याची धाकधूक लागली होती. मात्र राज्यांनी 16 उमेदवारांसाठी केलेल्या मतदानात डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वाधिक मते मिळवून उमेदवारीच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं त्यांच्या मुलानंही आनंद व्यक्त केला आहे. 89 उमेदवारांमधून माझ्या वडिलांची निवड होणे हे गौरवास्पद आहे. आम्ही तुमच्यावर प्रेम करत असून, वडिलांचं अभिनंदनही केलं आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची नोव्हेंबरात होणारी निवडणूक डेमॉक्रेटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होईल हे आता स्पष्ट झाले आहे. आता रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांच्यात थेट निवडणुकीत आमनेसामने येणार आहेत.
(डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाले तर 28 टक्के अमेरिकन्स घेणार कॅनडाचा आसरा)
डोनाल्ड ट्रम्प यांच्या उमेदवारीमुळे अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला धार्मिक, वांशिक रंग चढणार आहेत. इंडियानातील प्रायमरी निवडणुकीमध्ये ट्रम्प यांनी आघाडी घेतली होती. हिलरी क्लिंटन या बराक ओबामांच्या सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री होत्या आणि 'देशाच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी परराष्ट्र मंत्री' असा ओबामांनीच त्यांचा गौरवही केला. त्यांना महिला वर्गात, श्रमिकांत, कृष्णवर्णीय अमेरिकनांत आणि मध्यमवर्गीयांत मिळत असलेला पाठिंबा मोठा आहे. त्या बळावर त्या निवडणूक जिंकू शकतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
(माझ्या मंत्रिमंडळात निम्म्या महिला असतील -हिलरी)
भारताच्या दृष्टीने तर त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदी येणे हे विशेष महत्त्वाचे व लाभाचेही आहे. त्यांचा डेमॉक्रेटिक पक्ष नेहमीच भारताला अनुकूल राहिला आहे. हिलरी यांनीही त्यांच्या संबंध राजकीय कारकीर्दीत नेहमी भारताला अनुकूल अशाच भूमिका घेतल्या आहेत. याउलट ट्रम्प हे उघडपणे भारत, पाक, मेक्सिको, पूर्व युरोप व मध्य आशियाई देशांविषयी व त्यातील जनतेविषयी उथळपणे बोलत आले आहेत. त्यातला अनेकांवर असलेला त्यांचा रोष जाहीरही आहे.