रिपब्लिकन दावेदारांत ट्रम्प सर्वात पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2016 02:51 AM2016-01-24T02:51:59+5:302016-01-24T02:51:59+5:30
अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या इच्छुक उमेदवारांमध्ये उद्योगपती डोनाल्ड ट्रम्प सर्वात आघाडीवर असून त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी टेड क्रूज १४ टक्के
वॉशिंग्टन : अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या इच्छुक उमेदवारांमध्ये उद्योगपती डोनाल्ड ट्रम्प सर्वात आघाडीवर असून त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी टेड क्रूज १४ टक्के पिछाडीवर आहेत. अलीकडेच झालेल्या एका पाहणीतून हे स्पष्ट झाले.
बांधकाम व्यावसायिक असलेले ट्रम्प यांना संभाव्य प्राथमिक मतदारांपैकी ३४ टक्के लोकांचे समर्थन असून क्रूज यांना २० टक्के मतदारांनी पाठिंबा दर्शविला आहे. फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार फ्लोरिडाच्या सिनेटर मार्को रुबियो या एकमात्र दावेदार अशा आहेत, ज्यांची टक्केवारी दुहेरी अंकांची आहे. त्यांना ११ टक्के मतदारांनी पाठिंबा दिला. बेन कारसन ८ टक्के समर्थन घेत चौथ्या क्रमांकावर आहेत.
काही दिवसांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणात ट्रम्प ३५ टक्के मतदारांचा पाठिंबा मिळवत प्रथम क्रमांकावर होते, तर क्रूज २० टक्क्यांवर होते. टेक्सासचे सिनेटर असलेले क्रूज हे ट्रम्प यांचे राष्ट्रीय स्तरावरील एकमेव प्रतिस्पर्धी आहेत. ट्रम्प यांनी त्यांच्या विरुद्ध टिष्ट्वटरवर जोरदार हल्ला चढविला आहे.
क्रूज इमानदार आहेत का? असा प्रश्न विचारीत ट्रम्प यांनी म्हटले आहे की, त्यांचा वॉल स्ट्रीटशी संबंध असून त्यांना गोल्डमेन सॅक्स सिटी कमी व्याज दरावर कर्ज देत आहे. याचा कसलाही खुलासा करण्यात आलेला नाही. तसेच कसली संपत्ती विक्री झालेली नाही. अन्य एका टष्ट्वीटमध्ये त्यांच्या नागरिकत्वावर प्रश्न विचारले आहेत.
ट्रम्प म्हणाले की, क्रूज यांनी कॅनडाचे नागरिकत्व सोडलेले नाही. त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दावेदारी केल्यानंतर असे केले. ते कॅनडाचे पंतप्रधान होऊ शकतात. त्यांना अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचा कायदेशीर अधिकार नाही. ते आपल्या कर्जाचा खुलासा करीत नाहीत. (वृत्तसंस्था)