Nobel Prize Winners 2022: पैसा वाचविण्यावर संशोधन केले; बॅंकांचे महत्त्व सांगणाऱ्या तीन अर्थतज्ज्ञांना नोबेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 06:45 IST2022-10-11T06:45:25+5:302022-10-11T06:45:39+5:30
या ३ अर्थशास्त्रज्ञांना १० डिसेंबरला समारंभात ‘नोबेल पुरस्कार’ प्रदान करण्यात येईल.

Nobel Prize Winners 2022: पैसा वाचविण्यावर संशोधन केले; बॅंकांचे महत्त्व सांगणाऱ्या तीन अर्थतज्ज्ञांना नोबेल
स्टॉकहोम : बँका व वित्तीय संस्थांवर येणाऱ्या आर्थिक संकटांवर प्रभावी तोडगा काढण्याकरिता तसेच या संस्था अधिक मजबूत होण्यासाठी विशेष संशोधन करणारे अमेरिकी फेडरल रिझर्व्हचे माजी प्रमुख बेन बर्नान्के तसेच अमेरिकेतील दोन अर्थशास्त्रज्ञ डग्लस डायमंड, फिलिप दिब्विग या तिघांना यंदाचा अर्थशास्त्रासाठीचा ‘नोबेल पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
नोबेल पुरस्कार समितीने म्हटले आहे की, बेन बर्नान्के (६८ वर्षे) हे वॉशिंग्टनमधील ब्रुकिंग्स इन्स्टिट्यूशनमध्ये कार्यरत आहेत. १९३०च्या दशकातील आर्थिक मंदीमध्ये अनेक लोक बँकांतील आपल्या ठेवी काढून घेत होते. अमेरिकेमध्ये बँका बुडू नयेत म्हणून त्यावेळी घेतलेल्या निर्णयांचा अभ्यास बर्नान्के यांनी केला होता. अन्य दोन पुरस्कार विजेत्यांपैकी डग्लस डायमंड (६८ वर्षे) व फिलिप दिब्विग (६७ वर्षे) हे अनुक्रमे शिकागो विद्यापीठ व वॉशिंग्टन विद्यापीठामध्ये अध्यापन करतात. बँक ठेवींवर सरकारने दिलेली हमी त्या वित्तीय संस्थांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यास कशाप्रकारे मदत करते, याबद्दल डायमंड व दिब्विग यांनी संशोधन केले होते. (वृत्तसंस्था)
२००८च्या आर्थिक मंदीत झाला संशोधनाचा फायदा
२००८ साली जगामध्ये मोठी आर्थिक मंदी आली होती. बेन बर्नान्के तसेच अमेरिकेतील दोन अर्थशास्त्रज्ञ डग्लस डायमंड, फिलिप दिब्विग यांनी वित्तीय संस्थांबाबत केलेल्या अभ्यासाचा उपयोग या आर्थिक मंदीचा मुकाबला करताना झाला होता.
या ३ अर्थशास्त्रज्ञांना १० डिसेंबरला समारंभात ‘नोबेल पुरस्कार’ प्रदान करण्यात येईल.