संशोधकाने अभ्यासला भारतातील रात्रौ प्रकाश
By admin | Published: January 31, 2016 12:40 AM2016-01-31T00:40:35+5:302016-01-31T00:40:35+5:30
अमेरिकेच्या एका संशोधकाने गेल्या २० वर्षांत उपग्रहाद्वारे दररोज रात्री घेतलेल्या छायाचित्रांचे अध्ययन करून भारतात विजेमुळे पडणाऱ्या प्रकाशाच्या इतिहासाला लेखणीद्वारे उद्धृत केले आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या एका संशोधकाने गेल्या २० वर्षांत उपग्रहाद्वारे दररोज रात्री घेतलेल्या छायाचित्रांचे अध्ययन करून भारतात विजेमुळे पडणाऱ्या प्रकाशाच्या इतिहासाला लेखणीद्वारे उद्धृत केले आहे.
प्रसिद्धीमाध्यमांसाठी जारी करण्यात आलेल्या एका पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, मिशिगन विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्रोफेसर ब्रियान मिन यांनी जवळपास ८ हजार रात्रीतील ६ लाखांपेक्षा जास्त गावांतून येणाऱ्या प्रकाशाची उपग्रहातून घेण्यात आलेली छायाचित्रे आणि ४.४ अब्ज डाटा बिंदूंना जोडले आहे. मिन म्हणाले की, हा प्रकल्प भारतातील गावांत आलेल्या प्रकाशातील नाट्यमय बदल दाखवितो. पंजाब आणि हरियाणा येथील ग्रामीण भागात प्रकाशाचे प्रमाण वाढले आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि बिहार यासारख्या राज्यांत प्रकाशाचे प्रमाण वाढण्याची गती मंद आहे. १९९३ ते २०१३ या काळात गावात विजेसाठी गोबर गॅसचा वापर कमी झाला असून, रॉकेलवरील दिव्यांचा वापरही कमी झाला आहे. मात्र, अजूनही मोठा भूभाग अंधारातच राहतो.
या अभ्यासातून निघालेले निष्कर्ष विश्व बँक, यू एस नॅशनल ओशियानिक अँड अॅटमॉसफेरिक अॅडमिनिस्ट्रेशन अॅण्ड डेव्हलपमेंट सीड यांच्या सहकार्याने बनविण्यात आलेली वेबसाईट नाईट लाईटस्डॉट आयओवर टाकण्यात आले आहेत. (वृत्तसंस्था)
विद्यापीठाने म्हटले आहे की, विजेमुळे प्रकाशित करणाऱ्या प्रकल्पांवर होणाऱ्या परिणामांचा अद्भुत पैलू यातून दिसतो. याद्वारे प्रयोगकर्ते राज्य आणि जिल्हा स्तरावरील प्रगती पाहू शकतात. त्यातून गेल्या दोन दशकांत झालेले बदलही दिसून येतात.
मिन म्हणाले की, विजेमुळे मिळणाऱ्या प्रकाशाने गावांवर काय परिणाम झाला हे ग्रामीण भागातील लोकांनाही चित्राद्वारे कळू शकते.