Coronavirus: शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच पकडला 'जिवंत' कोरोना; होणार मोठा फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 02:32 PM2020-03-07T14:32:12+5:302020-03-07T14:40:42+5:30
China Coronavirus चा उपचार करताना महत्त्वाची मदत होणार
पेइचिंग: कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाचा फटका जगातल्या ८० देशांना बसला आहे. आतापर्यंत तीन हजारहून अधिक जणांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. कोरोनाच्या रचनेची नेमकी माहिती नसल्यानं त्यावर उपचार करणं कठीण जात आहे. कोरोनाचा विषाणू नेमका दिसतो कसा, याची माहिती मिळवण्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. चीनमधल्या शास्त्रज्ञांच्या एका पथकाला विषाणूची नेमकी रचना शोधण्यात यश मिळालं आहे. कोरोनाचा विषाणू कोशिकांमध्ये प्रवेश करतो, त्यावेळी कोशिकांची स्थिती नेमकी कशी असते, याचं छायाचित्र मिळवण्यात शास्त्रज्ञ यशस्वी ठरले आहेत.
कोरोनावर उपचार करण्यासाठी विषाणूची रचना समजून घेणं आवश्यक होतं. गेल्या कित्येक दिवसांपासून शास्त्रज्ञ यासाठी प्रयत्न करत होते. अखेर त्यांना यश आल्यानं कोरोना विषाणूवरील लस तयार करण्यात मोठी मदत होणार आहे. डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण चीनमधल्या शेनजेन इथल्या शास्त्रज्ञांच्या एका पथकानं कोरोनाच्या विषाणूचा फोटो प्रसिद्ध केला आहे.
फ्रोजन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप अॅनलिसिस तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कोरोनाचं छायाचित्र घेण्यात आलं आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वप्रथम विषाणूला निष्क्रीय करण्यात आलं. त्यानंतर त्याचं छायाचित्र टिपण्यात आलं. या तंत्रज्ञानाच्या मदतीनं विषाणूचा जैविक नमुना सुरक्षित करण्यात आला. त्यामुळे विषाणू जिवंत असताना त्याची नेमकी रचना कशी होती, याची माहिती शास्त्रज्ञांना मिळाली आहे.
कोरोनाचा विषाणू जिवंत असताना जसा दिसेल, तशीच रचना आम्ही पाहिल्याची माहिती संशोधन पथकाचे सदस्य आणि प्राध्यापक लिऊ चुआंग यांनी दिली. कोरोना विषाणू कोशिकांमध्ये कसा प्रवेश करतो, त्यामुळे कोशिकांवर कसा आणि काय परिणाम होतो, याची छायाचित्रं मिळवण्यातही शास्त्रज्ञांना यश आलं आहे. यासाठी शेनजेन नॅशनल क्लिनिकल मेडिकल रिसर्च सेंटर आणि सदर्न युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ काम करत होते.