लॉकडाऊनमुळं चीनमध्ये कोरोनापासून बचावले ७ लाख लोक; संशोधकांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 05:19 PM2020-04-02T17:19:05+5:302020-04-02T17:22:51+5:30
ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे संशोधक क्रिस्टोफर डाई यांनी म्हटले की, कोरोना व्हायरसचा हल्ला झाला, त्यावेळी पहिल्या ५० दिवसांत चीनमध्ये ३० हजार रुग्ण होते. मात्र वेळीच उपाययोजना केल्या नसत्य तर तिथे कोरोना बाधितांचा आकडा ७ लाखांपेक्षा अधिक असता.
नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी जगभरात प्रयत्न करण्यात येत आहे. अनेक देशांनी या आजाराला गांभीर्याने घेतले नाही. त्याचे परिणाम त्या देशांना भोगावे लागत आहेत. कोरोनाचा उगम झालेल्या चीनमध्ये वेळीच उपाययोजना करण्यात आल्यामुळे तब्बल ७ लाख लोक कोरोना व्हायरसपासून बचावल्याचा दावा करण्यात आला आहे.
कोरोना व्हायरसची सुरुवात झाल्यानंतर पहिल्या ५० दिवसांत करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे संपूर्ण चीनमध्ये ७ लाखहून अधिक लोक कोरोनाच्या संक्रमणापासून बचावले आहेत. तसेच वुहान व्यतिरिक्त इतर शहरात कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत झाल्याचा निष्कर्ष चीनमधील संशोधकांनी काढला आहे. सायंन्स जर्नलमध्ये हा निष्कर्ष प्रकाशित करण्यात आला आहे. ज्या देशांत कोरोना व्हायरस पहिल्या टप्प्यात आहे, तिथे सांयन्स जर्नलमध्ये केलेला अभ्यास उपयोगी ठरू शकतो.
ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे संशोधक क्रिस्टोफर डाई यांनी म्हटले की, कोरोना व्हायरसचा हल्ला झाला, त्यावेळी पहिल्या ५० दिवसांत चीनमध्ये ३० हजार रुग्ण होते. मात्र वेळीच उपाययोजना केल्या नसत्य तर तिथे कोरोना बाधितांचा आकडा ७ लाखांपेक्षा अधिक असता. मात्र लॉकडाऊन आणि प्रतिबंधांच्या मदतीने चीनने कोरोनाची साखळी मोडण्यात यश मिळवल्याचे डाई यांनी म्हटले.
संशोधकांनी अभ्यास करताना केस रिपोर्ट, लोकांच्या प्रवासाचा डेटा आणि आरोग्य विभागाच्या कामाचा आढावा घेतला. तसेच लॉकडाऊनपूर्वीच्या ४३ लाख लोकांच्या हालचालींचा अभ्यास केला. या व्यतिरिक्त चीनमधील शहरांमध्ये लागू केलेल नियम, उपाययोजना आणि रुग्णांची वाढती संख्या यावरही लक्ष्य ठेवले. चीनने वुहानमध्ये घेतलेल्या काळजीमुळे १३० शहरात कोरोना प्रसार रोखण्यासाठी वेळ मिळाल्याचे बीजिंग नॉर्मल विद्यापीठाचे महामारी विज्ञान विभागाचे असोसिएट प्रोफेसर हुआन तियान यांनी सांगितले.