Corona Virus : भय इथले संपत नाही! "दर 4 मिनिटाला कोरोनामुळे एकाचा मृत्यू"; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 07:46 AM2023-05-25T07:46:33+5:302023-05-25T07:58:49+5:30
Corona Virus : जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे.
वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना आता मेडिकल इमर्जन्सी नसल्याचं म्हटलं आहे. पण असं असताना देखील धक्कादायक माहिती समोर आली आहे. दर चार मिनिटाला एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, कोरोना कमकुवत लोक आणि कमी लसीकरण असलेल्या देशांना लक्ष्य करत आहे. गेल्या वर्षी हृदयविकार आणि कॅन्सरनंतर अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले.
कोरोनामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र अद्यापही आवश्यक लसीकरण आणि मास्क वापरण्याकडे लक्ष दिले जात नाही. वेटरन्स अफेयर्स सेंट येथील क्लिनिकल एपिडेमियोलॉजी सेंटरचे संचालक झियाद अल-एली म्हणाले की कोविड अजूनही बर्याच लोकांवर परिणाम करत आहे. आमच्याकडे यापासून वाचण्याचे मार्ग आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले होते की कोरोना आता मेडिकल इमर्जन्सी नाही. त्याच वेळी, बहुतेक देशांनी लॉकडाऊन आणि मार्गदर्शक तत्त्वे आधीच शिथील केली आहेत.
जगभरात लाखो लोकांचा मृत्यू
कोरोना साथीच्या सुरुवातीच्या टप्प्यात खूप खर्च केल्यानंतर, जागतिक नेते सर्वकाही पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, कोरोना संसर्ग विकसित होत आहे, जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. काही आठवड्यांपूर्वी भारतात कोरोना व्हायरसची प्रकरणे झपाट्याने वाढत होती. यामुळे देशात पुन्हा एकदा कोविड रुग्णालये सक्रिय झाली आहेत. राष्ट्रीय स्तरावर मॉक ड्रील सुरू झालं. पण काही वेळाने कोरोनाचे रुग्ण थांबू लागले ही दिलासादायक बाब होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"जगाने पुढच्या महामारीसाठी तयार राहावे; कोरोनापेक्षाही अत्यंत खतरनाक व्हायरस येतोय"
एका महाभयंकर साथीचा इशारा देण्यात आला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे प्रमुख डॉ. टेड्रोस अदनोम घेब्रेयसस यांनी धोक्याचा इशारा दिला की जगाने पुढच्या साथीच्या रोगासाठी तयारी करावी, जी कोविड-19 साथीच्या आजारापेक्षाही घातक असू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डब्ल्यूएचओचे प्रमुख डॉ. टेड्रोस अदनोम म्हणाले की, जगाने कोविडपेक्षाही घातक असलेल्या व्हायरससाठी तयार राहायला हवे. डब्ल्यूएचओ प्रमुखांनी इशारा दिला की, कोरोना अद्याप संपलेला नाही. ते म्हणाले की ते दुसऱ्या रूपात उदयास येण्याचा धोका आहे, ज्यामुळे आजारपण आणि मृत्यू होईल.