प्राचीन बौद्ध स्तूपाचा चीनमध्ये जीर्णोद्धार
By Admin | Published: September 18, 2015 03:08 AM2015-09-18T03:08:23+5:302015-09-18T03:08:23+5:30
सम्राट अशोक याने चीनला भगवान बुद्धाची आठवण म्हणून पाठविलेल्या व दोन हजार वर्षे जुन्या स्तूपाचा जीर्णोद्धार करून त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली.
नांगचेंग : सम्राट अशोक याने चीनला भगवान बुद्धाची आठवण म्हणून पाठविलेल्या व दोन हजार वर्षे जुन्या स्तूपाचा जीर्णोद्धार करून त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. तिबेटच्या जवळ असलेल्या चीनच्या क्विंगहाई प्रांतात या स्तूपाची प्रतिष्ठापना झाली आहे. भगवान बुद्धाचे अवशेष असलेल्या १९ स्तूपांपैकी हा एक आहे. या स्तूपाची प्रतिष्ठापना भारतीय भिक्खूने धार्मिक विधींनी केली. हा स्तूप बुद्ध धर्म भारतातून चीनमध्ये आल्याचे प्रतीक समजला जातो.
या स्तूपाला अशोक खांब असून त्यात भगवान बुद्धाची सोन्याची मूर्ती आहे. लडाखमधील द्रूकप् वंशाचे आध्यात्मिक नेते ग्लॅयवँग द्रूकप् यांनी मूर्तीला अभिषेक करून तिची मंगळवारी प्रतिष्ठापना केली. आख्यायिकेनुसार अडीच हजार वर्षांपूर्वी भगवान बुद्धाला दहन करण्यात आल्यानंतर त्याच्या अनुयायांना कवटीचे एक हाड, दोन खांद्याची हाडे, चार दात आणि ८४ हजार मोत्यासारखे अवशेष मिळाले. बुद्ध धर्माच्या नोंदीनुसार सम्राट अशोकाने शाक्यमुनींचे शरीर गोळा करून जगात ते विविध ठिकाणी पाठवायच्या आधी पॅगोडासारख्या पवित्र ठिकाणी ठेवले होते. चीनला त्यापैकी १९ मिळाल्याचे समजले जाते व नांगचेंग येथील स्तूप हा त्यापैकी एक आहे. (वृत्तसंस्था)
परंतु ऊन, वारा, पावसामुळे तसेच दुर्लक्षामुळे तो जमीनदोस्त झाला होता. शियान, नानजिंग आणि चीनच्या झेजियांग प्रांतातील अयुवँग येथेही आणखी तीन स्तूप सापडले आहेत. १९ स्तूपांपैकी एक स्तूप तिबेटमध्ये नांगचेंग येथील असून आणखी १५ स्तूप अज्ञात आहेत.
चीनमध्ये बुद्ध धर्माचा प्रवेश झाला. त्याच्या कालक्रमानुसार नोंदी इसवी सन पूर्व ६८ पासून ठेवण्यात आल्या आहेत. या वर्षी चीनमधील पहिले व्हाईट हॉर्स बुद्ध मंदिर लुओयांगमध्ये चिनी भिक्खू झुएनझानने बांधले. हा भिक्खू तब्बल १७ वर्षांचा समुद्र प्रवास करून भारतात पोहोचला होता. जगात बुद्ध धर्माचा प्रसार करण्याचे सम्राट अशोकाने किती प्रयत्न केले होते याचे हा स्तूप निदर्शक आहे.