पाकिस्तानात 64 वर्षांनंतर हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार, समाजाची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 03:20 PM2024-10-21T15:20:33+5:302024-10-21T15:21:18+5:30
1960 मध्ये या मंदिराची दुरवस्था झाली होती.
Pakistan News : स्वातंत्र्यापूर्वी आजच्या पाकिस्तानमध्ये अनेक हिंदूमंदिरे होती, पण हळुहळू या मंदिरांना नष्ट करण्यात आले. आता देशात मोजकीच मंदिरे असून, त्यातील बहुतांश जीर्ण झाली आहेत. अशातच, पाकिस्तान सरकारने पंजाब प्रांतातील एका हिंदू मंदिराच्या जीर्णोद्धाराचा निर्णय घेतला आहे. यासाठी एक कोटी पाकिस्तानी रुपयांच्या बजेटची तरतूदही करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, तब्बल 64 वर्षांनंतर पाकिस्तानात एखाद्या मंदिराचा जीर्णोद्धार होत आहे.
पाकिस्तानी 'डॉन न्यूज'च्या वृत्तानुसार, पाकिस्तानातील अल्पसंख्याकांच्या प्रार्थनास्थळांवर देखरेख करणारी संस्था इव्हॅक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड (ETPB) ने पंजाब प्रांतातील रावी नदीच्या पश्चिमेकडे स्थित नारोवाल शहरातील बावली साहिब मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू केले आहे. या मंदिराची 1960 मध्ये दुरवस्था झाली होती. सध्या नारोवाल जिल्ह्यात एकही हिंदू मंदिर नाही, ज्यामुळे हिंदू समुदायाला आपापल्या घरातच धार्मिक विधी करावे लागतात किंवा त्यासाठी सियालकोट आणि लाहोरमधील मंदिरांमध्ये जावे लागते.
एकेकाळी येथे 45 मंदिरे होती
पाक धर्मस्थान समितीचे माजी अध्यक्ष रतन लाल आर्य म्हणाले की, बावली साहिब मंदिरावर ईटीपीबीच्या नियंत्रणामुळे ते मोडकळीस आले आणि नारोवालमधील 1453 हून अधिक हिंदूंना त्यांच्या प्रार्थनास्थळापासून वंचित राहावे लागले. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर नारोवाल जिल्ह्यात 45 मंदिरे होती, परंतु ती सर्व दुरुस्तीअभावी मोडकळीस आली. पाक धर्मस्थान समिती गेल्या 20 वर्षांपासून बावली साहिब मंदिराच्या नूतनीकरणाची मागणी करत आहे. आता इतक्या वर्षांनंतर हिंदू समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारने मंदिराच्या दुरुस्तीसाठी पावले उचलली आहेत.
हेदेखील जाणून घ्या
पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाच्या 'वन मॅन कमिशन'चे अध्यक्ष शोएब सिद्दल आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य मंजूर मसीह यांनी या दुरुस्तीच्या प्रयत्नात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पाक धर्मस्थान समितीचे अध्यक्ष सावन चंद म्हणाले की, बावली साहिब मंदिराच्या नूतनीकरणामुळे हिंदू समुदायाची दीर्घकाळची मागणी पूर्ण होईल आणि त्यांना पूजास्थळी धार्मिक विधी करण्याची परवानगी मिळेल. विशेष म्हणजे, पाकिस्तानमध्ये हिंदू हा सर्वात मोठा अल्पसंख्याक समुदाय आहे. अधिकृत अंदाजानुसार, पाकिस्तानमध्ये 75 लाखांहून अधिक हिंदू राहतात.