नोव्हेंबरपासून इराणविरोधात निर्बंध पूर्णपणे लागू होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 01:39 AM2018-10-28T01:39:04+5:302018-10-28T06:44:45+5:30
व्हाइट हाऊसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ट्रम्प यांनी सांगितले की, अणुकरारान्वये मागे घेण्यात आलेले इराणविरोधातील सर्व निर्बंध ५ नोव्हेंबरपासून पुन्हा लागू होतील.
वॉशिंग्टन : इराण विरोधातील सर्व अमेरिकी निर्बंध ५ नोव्हेंबरपासून पूर्णांशाने लागू होतील, अशी घोषणा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. व्हाइट हाऊसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ट्रम्प यांनी सांगितले की, अणुकरारान्वये मागे घेण्यात आलेले इराणविरोधातील सर्व निर्बंध ५ नोव्हेंबरपासून पुन्हा लागू होतील.
हे निर्बंध पूर्ण शक्तीनिशी लावण्यात येतील. हे निर्बंध लागू झाल्यानंतर अधिक कठोर नवे निर्बंध इराणविरुद्ध आणण्यात येतील. आम्ही इराणला दहशतवादाचा प्रसार करू देणार नाही, तसेच घातक शस्त्रास्त्रेही विकसित करू देणार नाही, असेही ट्रम्प म्हणाले आहेत. बराक ओबामा यांनी इराणसोबत अणुकरार केला होता. या करारान्वये इराणविरोधातील निर्बंध मागे घेण्यात आले होते. ट्रम्प यांनी हा करार रद्द केला आहे. त्यानुसार, आता इराणविरोधातील सर्व निर्बंध पुन्हा लागू करण्यात येत आहेत. इराणकडून कच्चे तेल खरेदी करण्यावरही अमेरिकेने निर्बंध घातले आहेत. त्याचा फटका भारताला बसणार आहे. इराणकडून तेल खरेदी करायचे असल्यास भारताला अमेरिकेकडून विशेष सवलत मिळवावी लागेल; अथवा तेल आयत थांबवून शून्यावर आणावी लागेल.
लेबनॉनमधील अतिरेकी गट हिज्बोल्लाह विरुद्धही निर्बंध लावण्यात आल्याची घोषणा ट्रम्प यांनी यावेळी केली. त्यांनी सांगितले की, काही क्षणांपूर्वीच मी हिज्बोल्लाहविरुद्ध आणखी कडक निर्बंध लावण्यासाठी एका कायद्यावर स्वाक्षरी केली आहे.