इराणवरील निर्बंध ह्युवाईच्या सीएफओला भोवले; अमेरिकेत अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 01:22 PM2018-12-06T13:22:21+5:302018-12-06T13:24:13+5:30
मेंग वांगझू यांचे अमेरिकेकडे प्रत्यार्पण करण्यात येणार आहे.
वॉशिंग्टन : नची स्मार्टफोन निर्माता कंपनी ह्युवाईच्या जागतिक मुख्य वित्तीय अधिकारी मेंग वांगझू हिला 1 डिसेंबरला कॅनडामध्ये अटक करण्यात आली आहे. वांगझू यांनी इराणवर लादलेल्या अमेरिकी निर्बंधांचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ह्युवाईला बुधवारी याबाबतची माहिती देण्यात आली.
मेंग वांगझू यांचे अमेरिकेकडे प्रत्यार्पण करण्यात येणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार मेंग वांगझू हिने काहीही चुकीचे केलेले नाही. तर अमेरिकेत उत्पादित झालेल्या वस्तू मेंग वांगझू हिने इराणला पुरविल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. यामुळे अमेरिकी नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. यामुळे आधीच व्यापारयुद्धाच्या शिखरावर असलेल्या चीनसोबतचे संबंध आणखी बिघडण्याची चिन्हे आहेत.
चीनने वांगझू यांची तात्काळ सुटका करण्याची मागणी केली आहे. तिला जामिन मिळविण्यासाठी शुक्रवारी सुनावणी होणार आहे. मेंग वांगझू ही ह्युवाईची उपाध्यक्षही आहे. ती कंपनीचे जनक रेन झेंगफे यांची मुलगी आहे. रॉयटर्सनुसार अमेरिकेच्या तपाससंस्था दोन वर्षांपासून ह्युवाईची चौकशी करत आहेत.