तालिबान आणि हक्कानीच्या सहा दहशतवाद्यांवर निर्बंध, पाकवरही दबाव ; ट्रम्प प्रशासनाचे ठोस पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 04:11 AM2018-01-27T04:11:28+5:302018-01-27T04:12:02+5:30
ट्रम्प प्रशासनाने तालिबान आणि हक्कानी नेटवर्कच्या सहा नेत्यांवर शुक्रवारी निर्बंध आणतानाच पाकिस्तानला जबर हादरा दिला आहे.
वॉशिंग्टन : ट्रम्प प्रशासनाने तालिबान आणि हक्कानी नेटवर्कच्या सहा नेत्यांवर शुक्रवारी निर्बंध आणतानाच पाकिस्तानला जबर हादरा दिला आहे. पाकिस्तानने दहशतवादाविरुद्ध एकजुटीने काम करण्याचे वचन पाळत अतिरेक्यांना आश्रय आणि पैसा पुरविणे थांबवावे यासाठीही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दबाव वाढविला आहे.
अब्दुल समद सानी, अब्दुल कादीर बासीर अब्दुल बासीर, हाफिज मोहम्मद पोपलजई आणि मौलवी इनायतुल्ला या तालिबानच्या चार तसेच हक्कानी नेटवर्कचे फाकिर मोहम्मद आणि गुला खान हामिदी अशा दोन प्रमुखांवर निर्बंध आणतानाच अमेरिकेच्या वित्त विभागाने त्यांना जागतिक दहशतवादी घोषित केले आहे. हक्कानी नेटवर्क अफगाणिस्तानात अमेरिकन सैनिकांचे अपहरण आणि हल्ल्यांमध्ये गुंतला होता. भारताविरुद्धही त्याने घातक कारवाया केल्या आहेत. काबूलमध्ये २००८ साली भारतीय मिशनवर झालेल्या हल्ल्यात ५८ लोक मारले गेले होते. नववर्षातील आपल्या पहिल्याच टिष्ट्वटमध्ये ट्रम्प यांनी पाकिस्तानवर खोटारडेपणाचा आणि अमेरिकेला धोका दिल्याचा आरोप केला होता. अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी दिलेली मदत म्हणजे मूर्खपणा होय, असे विधानही त्यांनी केले.
अमेरिकेच्या अखत्यारित असलेल्या या सहाही दहशतवाद्यांची संपूर्ण संपत्ती जप्त केली जाणार असून, त्यांची अमेरिकन नागरिकांसोबतची आर्थिक देवाण-घेवाण थांबविली जाईल. अमेरिकन मित्र फौजांवरील हल्ले, तस्करी आणि अतिरेकी गटांचे आर्थिक पोषण करण्यात सहभागी असलेल्या तालिबान आणि हक्कानी नेटवर्कशी संलग्न सहा नेत्यांवर प्रतिबंध आणल्याची घोषणा दहशतवाद आणि वित्त गुप्तचर विभागाचे अवर सचिव सिगल मंडेलकर यांनी केली आहे.
तालिबान आणि हक्कानी नेटवर्कला आश्रय देणे थांबविण्यासह अतिरेक्यांना पैसा पुरविणाºयांना आक्रमकपणे लक्ष्य ठरविण्यासाठी आमच्यासोबत काम करायलाच हवे, असा इशारा मंडेलकर यांनी दिला आहे. दक्षिण आशियातील दहशतवादी संघटना खिळखिळ्या करण्यासह त्यांना कारवायांसाठी मदत करणाºया व्यक्तींवर जाहीररीत्या निर्बंध आणण्याची कृती ट्रम्प प्रशासनाच्या रणनीतीला समर्थक अशी मानली जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अब्दुल समद सानी याने २०१७ च्या प्रारंभी तालिबानी सदस्यांना शस्त्रे पुरवितानाच अफगाणिस्तान राष्टÑीय पोलिसांच्या (एएनपी)गस्ती पथकावर हल्ला घडवून आणला होता. त्यात पोलीस अधिकारी ठार तर दोघे जखमी झाले होते. २०१५ मध्ये सानी हा तालिबान वरिष्ठ दहशतवाद्यांच्या ‘शूरा’ गटाचा सदस्य होता. अफगाणिस्तानात लढणारे तालिबानी कमांडर्सना शस्त्रे आणि दारूगोळा पुरविण्यासाठी त्याने पैसा गोळा केला होता. तो तालिबानचा उप वित्त आयुक्त होता. तालिबानी राजवटीत अफगाण मध्यवर्ती बँकेचा गव्हर्नरही राहिला आहे.