मुल्ला फजलुल्लावर युनोचे निर्बंध
By admin | Published: April 9, 2015 12:33 AM2015-04-09T00:33:20+5:302015-04-09T00:33:20+5:30
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने पाकिस्तानचा तालिबान प्रमुख मुल्ला फजलुल्ला याच्यावर निर्बंध लागू केले आहेत. पेशावरमधील शाळेवर झालेल्या हल्ल्या
संयुक्त राष्टे : संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने पाकिस्तानचा तालिबान प्रमुख मुल्ला फजलुल्ला याच्यावर निर्बंध लागू केले आहेत. पेशावरमधील शाळेवर झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार म्हणून त्याच्यावर दहशतवादी कृत्ये करणे आणि दहशतवादाला आर्थिक मदत करणे असे आरोप ठेवण्यात आले आहेत.
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या निर्बंधाअंतर्गत फजलुल्ला (४०) याला अल काईदाच्या निर्बंधात समाविष्ट करण्यात आले असून, आता त्याची मालमत्ता जप्त केली जाईल. त्याला प्रवासबंदी, शस्त्रास्त्रे बाळगण्यासही बंदी घातली जाईल.
तेहरिक-ए-तालिबान पाकचा कमांडर असणारा मुल्ला फजलुल्ला हा रेडिओ मुल्ला म्हणून प्रसिद्ध असून, पाकिस्तानच्या खैबर आदिवासी भागात गेल्या महिन्यात करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे. तो मरण पावल्याचेही अनधिकृत वृत्त त्यावेळी प्रसिद्ध झाले होते.
अमेरिकेने जानेवारी महिन्यात त्याला जागतिक दहशतवादी असे घोषित केले असून, त्याच्यावर निर्बंध लागू केले आहेत.
सुरक्षा परिषदेने फजलुल्ला याचे नाव अल काईदाच्या यादीतील निर्बंधाअंतर्गत टाकले असून तेहरिक-ए-तालिबानमार्फत दहशतवादी कृत्ये करणे, त्यांचे नियोजन, आर्थिक तरतूद करणे असे आरोप ठेवण्यात आले आहेत. (वृत्तसंस्था)