‘रॉयटर्स’च्या ब्युरो चीफ मृतावस्थेत आढळल्या
By admin | Published: February 23, 2015 11:10 PM2015-02-23T23:10:14+5:302015-02-23T23:10:14+5:30
रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान ब्युरो चीफ मारिया गोलोव्हनिना सोमवारी इस्लामाबादेतील त्यांच्या कार्यालयात मृतावस्थेत आढळून आल्या.
इस्लामाबाद : रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान ब्युरो चीफ मारिया गोलोव्हनिना सोमवारी इस्लामाबादेतील त्यांच्या कार्यालयात मृतावस्थेत आढळून आल्या.
मारिया यांचे कार्यालय आणि निवासस्थान एकाच ठिकाणी आहे. सोमवारी त्या कार्यालयात बेशुद्ध पडल्या. रुग्णवाहिका तातडीने आली व त्यांना कुलसुम आंतरराष्ट्रीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टर त्यांचे प्राण वाचवू शकले नाहीत, असे रॉयटर्सने टष्ट्वीटरवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. रशियन नागरिक असलेल्या ३४ वर्षीय मारिया २००१ मध्ये रॉयटर्समध्ये रुजू झाल्या होत्या. त्यांची पहिली नेमणूक टोकियो येथे झाली होती. त्यानंतर त्यांनी ब्रिटन, सिंगापूर आणि रशियासह अन्य ठिकाणी वार्तांकन केले.
रेडिओ पाकिस्तानने सुरुवातीला दिलेल्या वृत्तात मारिया यांचा त्यांच्या निवासस्थानी मृतदेह आढळून आल्याचे आणि तो पाकिस्तान इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसमध्ये नेण्यात आल्याचे म्हटले होते. दरम्यान, मारिया यांच्या शरीरावर कोणतेही व्रण अथवा जखम आढळून आली नसल्याचे समजते. (वृत्तसंस्था)