हे पुर्ण कुटूंब घेतंय लखपती भिकाऱ्याचा शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 06:29 PM2017-11-28T18:29:30+5:302017-11-28T18:35:13+5:30
या भिकाऱ्याचं सापडणं त्या कुटूंबासाठी फार महत्त्वाचं झालं आहे आणि सर्व त्याचा कसून शोध घेत आहेत.
हरिद्वार - नशिबात असेल तर एखादा भिकारी एका रात्रीत लखपती बनू शकतो. यावर तुमचा विश्वास बसत नसेल तर हरिद्वारमध्ये घडलेली घटना तुम्ही ऐेकायलाच हवी. हरिद्वार येथे एक भिकारी एका रात्रीत तब्बल ४० लाखांचा मालक बनलाय. यासाठी त्याने खूप परिश्रम केले वगैरे अशातला भाग नाही किंवा त्याला लॉटरी लागली आहे, अशातलाही भाग नाही. पण तरीही तो लखपती बनला आहे.
आणखी वाचा - पोलिसांना पुशअप्स मारताना पाहून कुत्र्यालाही राहवलं नाही
उत्तराखंडमधील हरिद्वारच्या रानीपूर कोतवाली इथं हा चमत्कार घडलाय. इथल्या एका इसमाने कनखल येथील एका भजन मंदिराबाहेर बसलेल्या एका भिकाऱ्याला एक जुनी गादी देऊ केली. या इसमाने त्याच्या वडिलांना न विचारता परस्पर ही गादी दिल्याने खूप मोठा घोळ झाला. या गादीमध्ये तब्बल ४० लाख होते. आपल्या आयुष्याची जमापूंजी साठवून त्यांनी या गादीत हे पैसे लपवून ठेवले होते. मात्र त्यांच्या मुलाने जुनी गादी समजून ती गादी भिकाऱ्याला देऊ केली. त्यामुळे साहजिकच हे कुटुंब आता त्या भिकाऱ्याच्या शोधात आहे. हा प्रकार समोर आल्यावर लगेच हे कुटुंब त्या मंदिरात गेले ज्या ठिकाणी तो भिकारी बसलेला असायचा. मात्र ते त्या भिकाऱ्याच्या शोधात तिथे गेले असता त्यांना तो तिथे सापडला नाही. त्यांनी त्या परिसरात त्याला जंग-जंग पछाडलं. सगळीकडे चौकशी केली, मात्र तो काही सापडला नाही.
शेवटी तीन दिवसांनंतर तिथे तो भिकारी अखेर सापडला. आता आपले ४० लाख परत मिळणार या आशेने ते कुटुंब त्या भिकाऱ्याकडे गेलं. पण त्यांचा तिथं पुन्हा हिरमोड झाला. त्या भिकाऱ्याने ती गादी काही रुपयांत दुसऱ्या भिकाऱ्याला विकली होती. झाली की नाही पंचाईत. आता हे कुटुंब त्या दुसऱ्या भिकाऱ्याच्या शोधात आहे. याविषयी त्यांनी पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली आहे. मात्र पोलिसांनाही या भिकाऱ्याबद्दल काहीच माहित नाही. त्यामुळे आता ४०लाखासाठी त्या नव्या भिकाऱ्याला शोधण्याचं खूप मोठं आव्हान या कुटुंबाकडे आहे. पण ज्या इसमाला हे ४० लाख सापडले आहेत, त्या इसमाचं आयुष्यच नक्कीच पालटलं असेल, यात काहीच शंका नाही. आहे की नाही रंजक घटना. एका रात्रीत श्रीमंत होण्यासाठी लोक लॉटरी वगैरे काढतात. पण ध्यानीमनी नसतानाही जर कोणाला अशी लॉटरी लागली तर आश्चर्यच वाटेल ना.
सौजन्य - http://medianp.net