पाकिस्तानमधील सर्वांत श्रीमंत नेता, 400 अरब संपत्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2018 11:33 AM2018-06-24T11:33:05+5:302018-06-24T11:47:19+5:30
पाकिस्तानमध्ये आगामी निवडणुकीसाठी मुजफ्फरगडमधील एका अपक्ष उमेदवाराने 403 अरब रुपयांची संपत्ती घोषित केली आहे. मोहम्मद हुसैन शेख असे या उमेदवाराचे नाव आहे.
मुजफ्फरगड : पाकिस्तानमध्ये आगामी निवडणुकीसाठी मुजफ्फरगडमधील एका अपक्ष उमेदवाराने 403 अरब रुपयांची संपत्ती घोषित केली आहे. मोहम्मद हुसैन शेख असे या उमेदवाराचे नाव आहे. याचबरोबर, मुजफ्फरगड शहरातील जवळपास 40 टक्के जमिनीचा मालक असल्याचा दावा मोहम्मद हुसैन शेख यांनी केला आहे.
पाकिस्तानमधील स्थानिक वृत्तपत्र डॉन न्यूजच्या माहितीनुसार, मोहम्मद हुसैन शेख यांचा दावा आहे की, सुरुवातीला ही जमीन वादात होती. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने गेल्या काही दिवसांपूर्वी यावर निर्णय दिला असून या जमिनीवर मोहम्मद हुसैन शेख यांचा हक्क आहे. या प्रकरणाचा वाद गेल्या 88 वर्षांपासून सुरु होता. मोहम्मद हुसैन शेख यांनी सांगितले की, एकूण 403 अरब रुपयांच्या जमिनीचा मालक आहे.
दरम्यान, मोहम्मद हुसैन शेख NA-182 आणि PP-270 या जागांसाठी निवडणूक लढत आहेत. पाकिस्तानमध्ये सध्या निवडणूक लढणारे मोहम्मद हुसैन शेख सर्वांत श्रीमंत उमेदवार आहे. याचबरोबर, मरियम नवाज शरीफ, बिलावल भुट्टो झरदारी आणि आसिफ अली झरदारी यांनी सुद्धा करोडो रुपयांची संपत्ती घोषित केली आहे. तर, पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज पार्टीचे आमिर मुकाम आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या उमेदवारांनी अरब रुपयांची संपत्ती घोषित केली आहे.